महाविकास आघाडी आज आवळणार ‘वज्रमूठ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2023 08:00 AM2023-04-16T08:00:00+5:302023-04-16T08:00:07+5:30
Nagpur News महाविकास आघाडीतर्फे रविवारी सायंकाळी ५ वाजता पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानावर ‘वज्रमूठ’ सभा आयोजित करण्यात आली आहे.
नागपूर : महाविकास आघाडीतर्फे रविवारी सायंकाळी ५ वाजता पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानावर ‘वज्रमूठ’ सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या मैदानावरून भाजपने विरोध केला. मात्र, न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर या सभेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पूर्ण ताकद लावली आहे. या सभेत मोठी गर्दी जमवून भाजपला चोख उत्तर दिले जाणार आहे.
या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खा. संजय राऊत, माजी मंत्री आदित्य ठाकरे, सभेचे संयोजक आ. सुनील केदार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे बहुतांश नेते उपस्थित राहणार आहेत.
या सभेसाठी दर्शन कॉलनीचे मैदान देण्यास भाजपने विरोध केला होता. स्थानिक नागरिकांना सोबत घेत भाजप नेत्यांनी आंदोलनही केले. न्यायालयात आव्हानही दिले. मात्र, एवढे अडथळे पार करून ही सभा होत असल्याने नेत्यांसह कार्यकर्त्यामध्येही जोश आहे. दोन आठवड्यांपासून नेत्यांनी पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात सभेच्या तयारीसाठी बैठका घेतल्या. नागपूर हा कुणाचा गड आहे, हे सभेनंतर दिसेल, असा सूचक इशाराही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपला दिला आहे.
नेत्यांची दिवसभर मैदानावर वर्दळ
- सभेसाठी दर्शन कॉलनी मैदान सज्ज झाले आहे. भव्य स्टेज उभारण्यात आला असून सुमारे ४० हजारांवर खुर्च्या लावण्यात आल्या असून लाखांवर लोक येतील, असा आयोजकांचा अंदाज आहे. दरम्यान, सभेची तयारी पाहण्यासाठी शनिवारी दिवसभर नेत्यांची मैदानावर वर्दळ होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खा. विनायक राऊत, आ. सुनील प्रभू, माजी मंत्री अनिल देशमुख, विजय वडेट्टीवार, रणजित कांबळे आदींनी भेट देत मैदानाची पाहणी केली. शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या उपस्थितीत रात्री महाकाळकळ सभागृहात बैठक घेण्यात आली.