विद्यापीठात महाबॅकलॉग
By admin | Published: May 8, 2017 02:07 AM2017-05-08T02:07:06+5:302017-05-08T02:07:06+5:30
नागपूरला एज्युकेशनल हब बनविण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरला एज्युकेशनल हब बनविण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. मात्र सरकारी अनास्था आणि विद्यापीठातील घाणेरड्या राजकारणामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात रिक्त पदांचा महाबॅॅकलॉग तयार होत आहे. सध्या एकूण ९४१ मंजूर पदापैकी ३७३ पदे रिक्त आहे. जुन अखेर यात आणखी भर पडणार आहे. त्यामुळे एज्युकेशनल हबची संकल्पना वास्तवात साकारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याकडे लक्ष देतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पदवी अभ्यासक्रमांना सत्र प्रणाली लागू झाल्यापासून विद्यापीठाचे काम आणखी वाढले आहे. विशेषत: प्राध्यापक व कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. मात्र प्रत्यक्षात कमी मनुष्यबळातच विद्यापीठाचा कारभार सुरू आहे. विद्यापीठाचे पदव्युत्तर विभाग व संचालित महाविद्यालयात शिक्षकांची ४७ टक्के पदे रिक्त आहेत. तर तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांची १५१ पदे रिक्त आहेत. तृतीय श्रेणीपेक्षा विद्यापीठात शिक्षकांची पदे जास्त प्रमाणात रिक्त आहेत. अशास्थितीत विद्यापीठाचा कारभार कसा चालेल व
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे प्राप्त होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर विद्यापीठाकडे विचारणा केली होती. नागपूर विद्यापीठात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या किती व कोणत्या जागा रिक्त आहेत, याबाबत त्यांनी प्रश्न विचारले होते. विद्यापीठातर्फे प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार विद्यापीठात शिक्षकांची एकूण ४६५ मंजूर पदे आहेत. त्यापैकी केवळ २४३ पदे भरण्यात आली असून, २२२ पदे रिक्त आहेत. सहायक प्राध्यापकांची सर्वात जास्त ६८ पदे रिक्त आहेत तर सहयोगी प्राध्यापकांची ४६ पदे रिक्त आहेत. तृतीय श्रेणीत रिक्त पदांचे प्रमाण मोठे आहे. विद्यापीठात तृतीय श्रेणीची ४७६ मंजूर पदे आहेत. यापैकी ३२५ पदे भरली असून, १५१ म्हणजेच सुमारे ३१ टक्के पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये निम्न श्रेणी लिपिकांची ६४, उच्च श्रेणी लिपिकांची १५ तर निवड श्रेणी लिपिकांची १३ पदे आहेत. जर शिक्षक व तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची तुलना केली तर शिक्षकांची जास्त पदे भरण्याची गरज असल्याचे दिसून येते.