वाडीत महावितरणचे ‘ब्रेकडाऊन’
By admin | Published: August 3, 2016 02:45 AM2016-08-03T02:45:23+5:302016-08-03T02:45:23+5:30
खडगाव मार्गावरील बहुतांश भाग मंगळवारी महावितरणच्या ‘ब्रेकडाऊन’मुळे अंधारात बुडाला.
नागरिकांमध्ये संताप : वाढत्या तक्रारींमुळे कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील फोन उचलून ठेवला
नागपूर : खडगाव मार्गावरील बहुतांश भाग मंगळवारी महावितरणच्या ‘ब्रेकडाऊन’मुळे अंधारात बुडाला. याबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारी पाहता कर्मचाऱ्यांनी दूरध्वनी उचलून बाजूला ठेवून दिला. त्यामुळे फोन ‘एन्गेज’ असल्याचे सांगितले जात होते. कर्मचाऱ्यांच्या या कृतीमुळे वाडीमध्ये संताप पसरला आहे. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता.
वाडीच्या खडगाव मार्गावर एका ठिकाणी ‘ब्रेकडाऊन’ झाले. स्फोट झाल्यासारखा आवाज होऊन सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास खडगाव मार्गावरील कोहळे ले-आऊट, टेकडीवाडी, वेणानगर, रतनविहारसह अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. बऱ्याच वेळानंतर वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांनी याबाबत महावितरणच्या कार्यालयाला याबाबत विचारणा केली. तरीही वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. यामुळे महावितरणच्या कार्यालयाकडे तक्रारींचा ओघ सुरू झाला. ते पाहता त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी फोन रिसिव्हर उचलून बाजूला ठेवून दिला. त्यामुळे फोन वारंवार एन्गेज असल्याचे सांगितले जात होते. कर्मचाऱ्यांच्या या मुजोर कृत्यामुळे वाडीतील नागरिकांमध्ये संताप पसरला आहे.
सध्या पावसाचे दिवस आहे. त्यातच अनेक भागात नगर परिषदेने साफसफाई केलेली नाही. परिणामी डासांची संख्या वाढलेली आहे. त्यातच रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. वीजपुरवठा खंडित होणे ही वाडीवासीयांसाठी नित्याचीच बाब झाली आहे. त्यातही ही समस्या पावसाळ्यात खूपच जास्त प्रमाणात उद्भवते. रात्री - मध्यरात्री वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना उकाडा सहन केल्याशिवाय पर्याय नसतो. रात्रीच्या वेळी कार्यालयात फोन केला तरीही कार्यालयातून काहीही प्रतिसाद मिळत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)