महादेवाचा नंदी पितोय दूध! इंदूरनंतर नागपुरातही लागल्या भाबड्या भक्तांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2022 10:24 PM2022-03-05T22:24:27+5:302022-03-05T22:25:15+5:30
Nagpur News इंदूरच्या आलिराजपूर येथील मंदिरात महादेवाचा नंदी दूध पित असून भक्तांची गर्दी झाल्याचे व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल झाल्यानंतर शनिवारी नागपुरातील शिवमंदिरातही असाच प्रकार घडला.
नागपूर : इंदूरच्या आलिराजपूर येथील मंदिरात महादेवाचा नंदी दूध पित असून भक्तांची गर्दी झाल्याचे व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल झाल्यानंतर शनिवारी नागपुरातील शिवमंदिरातही असाच प्रकार घडला. सायंकाळी शहरातील विविध भागातील तसेच ग्रामीण भागातही भाबड्या भक्तांनी शिवमंदिरांमध्ये धाव घेतली. पेल्यात पाणी घेऊन नंदीला पाणी पाजण्याचा प्रयोग केला. अनेकांनी तर नंदी पाणी पीत असल्याचा दावा करीत याचा संबंध थेट पाप-पुण्याशी जोडला. मात्र, हा विज्ञानाचा प्रकार असल्याचे अंधश्रद्धा निमूर्लन समितीने स्पष्ट केले आहे.
नागपुरात बेलतरोडी, मनिषनगर रोड येथील महापुष्प सोसायटीमधील दक्षिणेश्वर शिव मंदिरात महादेवाचा नंदी दूध पित असल्याच्या अफवेने भक्तांची गर्दी उसळली आहे. उत्तर नागपुरातील नारा परिसरातही अशीच गर्दी झाली. सावनेरच्या शिवमंदिरात तर नंदिला पाणी पाजण्यासाठी रांगा लागल्या. भक्तांनी याचे व्हिडिओ व्हायरल केले. पाहता-पाहता या अफवेचे स्तोम संपूर्ण शहरात पसरले. रात्री तर बहुतांश मंदिरांमध्ये गर्दी उसळळी. काहिंनी तर पाण्यासोबत दूध पाजण्याचा प्रयत्न केला.
२०-२५ वर्षांपूर्वीही नागपुरात असाच प्रकार उघडकीस आला होता. श्री गणपती दूध पित असल्याच्या अफवेने संपूर्ण देशभरातील देवालयांमध्ये अघोषित यात्रा भरली होती. त्यानंतर, सहा-सात वर्षांपूर्वीही असाच प्रकार नागपुरात दिसून आला होता. आता पुन्हा नंदी दूध पित असल्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे.
हा ‘सरफेस टेंशन’चा प्रकार
- नंदी म्हणा वा कोणतीही पाषाण मूर्ती दूध किंवा पाणी पित नाही. हा ‘सरफेस टेंशन’चा प्रकार आहे. पाषाण, लोखंड व लाकूड कोणत्याही विजातीय विशेषत: द्रव पदार्थाच्या संपर्कात आल्यास द्रव पदार्थ जसे पाणी, दूध ओढून घेतात. त्यामुळे हे पदार्थ दूध वा पाणी पित असल्याचे भासते. मात्र, थोड्या वेळानंतर तेच द्रव पदार्थ संबंधित वस्तूवर खालच्या दिशेने घरंगळत आल्याचे दिसून येते. नंदी पाणी किंवा दूध पितो, अशी कोणी अफवा कुणी पसरवत असेल, तर हा कायद्याने गुन्हा आहे. त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
- हरिश देशमुख, राष्ट्रीय महासचिव, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती.
............