महादेवाची यात्रा रद्द, भाविक हिरमुसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:09 AM2021-02-24T04:09:03+5:302021-02-24T04:09:03+5:30
नागपूर : सातपुडा पर्वतरांगांच्या सर्वात उंच टोकावर भरणारी महादेवाची यात्रा यंदा स्थगित करण्यात आली आहे. यामुळे चौरागडच्या यात्रेला जाणारे ...
नागपूर : सातपुडा पर्वतरांगांच्या सर्वात उंच टोकावर भरणारी महादेवाची यात्रा यंदा स्थगित करण्यात आली आहे. यामुळे चौरागडच्या यात्रेला जाणारे महाराष्ट्रातील भाविक मात्र हिरमुसले आहेत. मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यात असलेल्या पचमढी येथील चौरागडावर महाशिवरात्रीला दरवर्षी मोठी यात्रा भरत असते. महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविकांची यात्रेला मोठी गर्दी असते. मात्र यंदा महाराष्ट्रात वाढत असलेले कोरोना संक्रमण आणि रुग्णांची संख्या लक्षात घेऊन मध्य प्रदेशच्या गृहमंत्रालयाने महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या जिल्ह्याधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. यात यात्रेच्या आयोजनासंदर्भात संदर्भात निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. २२ फेब्रुवारीला या संदर्भात निर्देश देण्यात आले होते. याचा आधार घेऊन होशंगाबाद आणि छिंदवाड़ा जिल्ह्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसोबत बैठक घेतली. त्यानंतर गृहमंत्रालयासोबत चर्चा करून यंदा होणारी महादेवाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
या यात्रेसाठी महाराष्ट्रातील नागपूर, विदर्भासह अन्य जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक जातात. परंपरेनुसार, मनोकामना पूर्ण झाल्यावर त्रिशूळ घेऊन भाविक नवस फेडण्यासाठी पायदळ किंवा वाहनांनी जातात, हे विशेष ! आठ दिवसांपूर्वीच होशंगाबाद आणि छिंदवाडा येथील जिल्ह्याधिकाऱ्यांनी यात्रास्थळाचा दौरा करून पाहणी केली होती. कोविड नियमांचे पालन करण्यासोबतच गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी योग्य त्या सूचनाही दिल्या होत्या. ११ मार्चला येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त ३ ते १३ मार्च या काळात ही यात्रा भरणार होती. मात्र २२ फेब्रुवारीला मध्य प्रदेश गृहमंत्रालयाने घेतलेल्या निर्णयात ही यात्रा रद्द केली आहे.
...
होशंगाबाद जिल्ह्यात आहे चौरागड
महादेवाची यात्रा होशंगाबाद जिल्ह्यातील पचमढी येथे भरते. भाविक पचमढीवरून हिवरमार्गे चौरागडाकडे रवाना होतात. या शिवाय छिंदवाडा जिल्ह्यातील सांगाखेडा गावातून या यात्रेला प्रारंभ होतो. भूराभगत स्थळावरून यात्रेकरू चौरागडाला पोहचतात. नागपुरातून जाणारे भाविक दोन्ही मार्गाने जाऊन महादेवाची यात्रा पूर्ण करतात आणि भोलेनाथाला त्रिशूळ अर्पण करतात. दर्शन, पूजाअर्चा करण्यासाठीही लाखोंच्या संख्येने भाविक जात असतात. नागपुरातील अनेक संस्था येथे महाप्रसादाचे आयोजन करत असतात. यासाठी ट्रकांमधून खाद्य सामग्री महादेवाच्या यात्रेसाठी पाठविली जाते.
...