‘युपीएससी’त तेजाळली महाज्योती, ४४ पैकी ११ विद्यार्थी युपीएससी परीक्षेत यशस्वी

By आनंद डेकाटे | Published: May 24, 2023 05:08 PM2023-05-24T17:08:46+5:302023-05-24T17:10:05+5:30

केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल मंगळवारी जाहीर झाला

Mahajyoti shines in UPSC, 11 out of 44 students are successful in UPSC exam | ‘युपीएससी’त तेजाळली महाज्योती, ४४ पैकी ११ विद्यार्थी युपीएससी परीक्षेत यशस्वी

‘युपीएससी’त तेजाळली महाज्योती, ४४ पैकी ११ विद्यार्थी युपीएससी परीक्षेत यशस्वी

googlenewsNext

नागपूर : (युपीएससी) नागरी सेवा परीक्षेत यंदा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी राहिली. यातही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती),नागपूर ही संस्था अधिक उजळून निघाली. महाज्योतीने युपीएससी परीक्षेत व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी अर्थसहाय्य केलेल्या ४४ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ११ विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी ठरले. या ११ विद्यार्थ्यांमध्ये ४ ओबीसी, ३ विमुक्त जाती, ३ भटक्या जमाती (ड)आणि विशेष मागास प्रवर्गातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.

महाज्योतीने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यु.पी.एस.सी. नागरी सेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता २५ हजार रूपये प्रत्येकी अर्थसहाय्य करण्याची योजना सुरु केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकूण ४७ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी योजनेकरिता पात्र ४४ विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यात आले होते.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यात महाज्योतीने अर्थसहाय्य दिलेल्या ४४ विद्यार्थ्यांपैकी ११ विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमधे अभिषेक दुधाळ, ओंकार गुंडगे, पल्लवी सांगळे, शुभाली परिहार, शुभांगी केतन, श्रृती कोकटे, रोशन कच्छाव, अनुराग घुगे, सागर देठे, अनिकेत पाटील, आदित्य पाटील यांचा समावेश आहे.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा. तसेच महाज्योतीतर्फे राबविण्यात येणाऱ्या युपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी आर्थिक सहाय्य योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.

- राजेश खवले, व्यवस्थापकीय संचालक महाज्योती

यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोगत महाज्योतीतर्फे आर्थिक सहाय्य योजनेची खुप मदत झाली. आर्थिक सुरक्षिततेने बळ वाढवले निश्चिंत मनाने मुलाखत देता आली. मला अभिमान वाटते की आर्थिक विवंचनेत अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या मागास प्रवर्गातील विद्यार्थांना महाज्योतीची मदत आहे.

- शुभाली परिहार

महाज्योती अशा योजनांच्या माध्यमातून माझ्यासारख्या असंख्य मुलास प्रशिक्षण देऊन, अर्थ सहाय्य करुन स्वत:च्या पायावर उभे राहण्यास आत्मनिर्भर बनविण्याचे मोठे काम करीत आहे.

- रोशन कच्छाव

Web Title: Mahajyoti shines in UPSC, 11 out of 44 students are successful in UPSC exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.