महाकवी सुधाकर गायधनी यांचे ‘देवदूत’ सातासमुद्रापार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2022 06:51 PM2022-02-26T18:51:33+5:302022-02-26T18:52:51+5:30
Nagpur News महाकवी सुधाकर गायधनी यांच्या ‘देवदूत’ या महाकाव्याचा स्पेनमधील प्रसिद्ध कवयित्री ॲनाबेल यांनी स्पॅनिश भाषेत अनुवाद केला असून, लवकरच ताे प्रकाशित हाेणार आहे.
नागपूर : जगभर लाेकप्रिय ठरलेल्या महाकवी सुधाकर गायधनी यांच्या ‘देवदूत’ या महाकाव्याचा स्पेनमधील प्रसिद्ध कवयित्री ॲनाबेल यांनी स्पॅनिश भाषेत अनुवाद केला असून, लवकरच ताे प्रकाशित हाेणार आहे. फेसबुकवरून ताे स्पॅनिश वाचकांच्या पसंतीलाही येत आहे.
युराेप-अमेरिकेतील देशांमध्ये इंग्रजी, इटालियन, राेमानियन, फ्रेंच, मेसेडाेनियम, स्पॅनिश तसेच रशियन, चिनी या भाषांसह तामिळ आणि हिंदी भाषेत रूपांतरित हाेण्याचे भाग्य सुधाकर गायधनी यांच्या समग्र देवदूत या महाकाव्याला लाभले आहे. त्यांच्या काही कवितांचे आजवर जगातील २२ भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यामुळे पाश्चिमात्य वाचकांमध्ये मराठी भाषेविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. सुधाकर गायधनी यांना हा बहुमान लाभला आहे. उल्लेखनीय म्हणजे राेमानियन मासिकाने गायधनी यांच्या कवितांवर विशेषांक काढून त्यांना ‘विलियम ब्लेक ॲवार्ड’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. याशिवाय इटलीच्या ‘वर्ल्ड युनियन ऑफ पाेएट्स’ या संस्थेने त्यांना ‘सिल्व्हर क्राॅस फाॅर कल्चर मेडल’ या विशेष सन्मानाने गाैरविले आहे.
सुधाकर गायधनी यांनी १९७४ साली हाेळी पाडव्याच्या दिवशी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या नाशिक येथील निवासस्थानी संपूर्ण देवदूतचे वाचन केले आहे. गायधनींच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद प्रा. डाॅ. ओम बियानी, विश्वास वैद्य, आनंद जाेग, गाैरी देशपांडे, विश्वाभा, प्रा. डाॅ. तेजस्विनी पाटील डांगे या नामवंत कवींनी केला आहे.