महाल, बडकस चौकात सर्वाधिक वर्दळ, वाहनांच्या गर्दीत पायी चालायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:07 AM2021-07-21T04:07:52+5:302021-07-21T04:07:52+5:30

नागपूर : उपराजधानी नागपूर एकीकडे चकचकीत होत असली तरी दुसरीकडे शहरातील बाजारपेठा दिवसेंदिवस समस्याग्रस्त होत चालल्या आहेत. अरुंद रस्ते, ...

Mahal, the busiest in Badkas Chowk, how to walk in a crowd of vehicles? | महाल, बडकस चौकात सर्वाधिक वर्दळ, वाहनांच्या गर्दीत पायी चालायचे कसे?

महाल, बडकस चौकात सर्वाधिक वर्दळ, वाहनांच्या गर्दीत पायी चालायचे कसे?

Next

नागपूर : उपराजधानी नागपूर एकीकडे चकचकीत होत असली तरी दुसरीकडे शहरातील बाजारपेठा दिवसेंदिवस समस्याग्रस्त होत चालल्या आहेत. अरुंद रस्ते, फेरीवाल्यांचे हातठेले, व्यावसायिकांचे अतिक्रमण आणि रस्त्याच्या कडेला पार्क केलेली वाहने, यामुळे पायदळ जाणाऱ्यांना सुरक्षित मार्गच उरला नसल्याची स्थिती आहे.

महाल आणि त्या सभोवतालचा परिसर व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या परिसरालगतच्या सर्व गल्ल्या आणि मार्गावर दुकाने आणि फेरीवाल्यांचा व्यवसाय आहे. मध्यवर्ती ठिकाण असलेल्या परिसरात ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. यामुळे येथून पायी चालणेही कठीण असते.

...

रोज लाखो लोकांची ये-जा

सीताबर्डी बाजारपेठेचा भाग असलेल्या झाशी राणी चौक, व्हेरायटी चौकातून शहराच्या चारही भागात मार्ग निघतो. येथे बाजारपेठ मोठी आहे. कॉटन मार्केट चौकातून रेल्वे स्टेशन, महालकडे मार्ग निघतो. हा चौकही नेहमी गजबजलेला असतो. गांधीबाग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुलपेठ, लक्ष्मीभवन चौक, गांधीबाग मार्केट, इतवारी बाजार परिसरातही प्रचंड गर्दी असते. सक्करदरा चौक, मानेवाडा चौक रिंग रोड, पारडी चौक, सदर, मेडिकल कॉलेज चौक, मोमीनपुरा, हंसापुरी, पाचपावली, इतवारी दहीबाजार या चौकातही पायी चालता येणार नाही, एवढी गर्दी असते.

...

फूटपाथ कागदावरच

शहरातील बाजारपेठेत तर फूटपाथ नाहीतच. काही ठिकाणी असले तरी ते दिसत नाही. कारण त्यावर फेरीवाले आणि दुकानदारांचे अतिक्रमण असते. यामुळे वाहनांच्या गर्दीतून वाट काढत जोखीम पत्करून चालण्याशिवाय गत्यंतर नसते. महिलावर्गाची तर फारच अडचण होते. ज्येष्ठ नागरिक तर या मार्गावरून चालूच शकत नाही.

...

अतिक्रमण हटाव दाखवायलाच

शहरात लॉकडाऊनपूर्वी अतिक्रमण हटावो मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतरच्या काळात मोठी कारवाई झाली नाही. मोहीम झाल्यावर दुकानदार आणि फेरीवाले पुन्हा बसतात. पथकाची पाठ फिरली की सर्वकाही जुन्यासारखेच होते. कारवाई नावापुरती उरते. अलीकडे लहानसहान कारवाया होत असल्या तरी त्याची भीती राहिलेली नाही.

...

पायी चालायला भीती वाटते (प्रतिक्रिया)

१. आम्ही याच परिसरात राहतो. कामानिमित्त या मार्गावरून रोज जावेच लागते. मात्र गर्दीतून वाट काढताना भीती वाटते. हॉर्नचाही मोठा त्रास होतो. पर्यायी मार्ग नाही.

- दत्ता कडू, गणेशपेठ

२. गर्दी बरीच असली तरी हे मुख्य मार्केट असल्याने आम्हाला नेहमीच यावे लागते. पार्किंगचीही मोठी अडचण आहे. चालण्यासाठी फूटपाथ राहिलेलाच नाही.

- अंकुश शिरभाते

...

कोट

आमची मोहीम सतत सुरूच असते. ती थांबलेली नाही. कारवाईनंतर साहित्य परत करावे लागते. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणासोबतच वाहनांचेही अतिक्रमण आहे. ही जबाबदारी एकट्या महानगरपालिकेची नसून वाहतृूक विभागाचीही तेवढीच आहे.

- अशोक पाटील, सहायक उपायुक्त, मनपा

...

Web Title: Mahal, the busiest in Badkas Chowk, how to walk in a crowd of vehicles?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.