उपराजधानीत महाशिवरात्रीला महामंत्राचा गजर...ओम नम: शिवाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2022 09:00 AM2022-03-02T09:00:00+5:302022-03-02T09:00:03+5:30
Nagpur News महाशिवरात्रीनिमित्त नागपुरातील शिवालयांमध्ये भाविकांनी मोठ्या श्रद्धाभावाने पूजन केले.
नागपूर : मंगळवारी नागपुरात महाशिवरात्री जल्लोषात साजरी झाली. घरोघरी महाशिवरात्रीचे पुजन झाले आणि शिवालये, देवालये भक्तांच्या गर्दीने गजबजली होती. केवळ शिवालयेच नव्हे तर जागोजागी महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक आयोजनांसोबतच, रुद्र, लघुरुद्र, अभिषेक, भजन-पुजन आणि रक्तदान, आरोग्य तपासणीसारख्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन झाले. अनेक ठिकाणी उपवासाच्या प्रसादाचे वितरण झाले. शहरातील शिवालये, स्मशानभूमीमध्ये भक्तांनी ‘कंकड कंकड शिवशंकर, तु भज प्यारे दिल के अंदर’ असे म्हणत आदी आणि अनंताची महादेवता म्हणून अर्धनरनारी नटेश्वर अर्थात महाशिवाची आराधना केली.
२०२० मध्ये नागपुरात कोरोना संक्रमणाचा शिरकाव झाल्यानंतर तब्बल दोन वर्षे कोणत्याही धार्मिक सोहळ्यांना उत्सवाचे स्वरूप देता आले नाही. संक्रमणाच्या सलग तिन लाटेवर स्वार होत नागरिकांनी कोरोना सारख्या सुक्ष्म दैत्याचा सामना केला. आता संक्रमणाचा जोर संपत असल्याच्या स्थितीत महादेवाच्या चरणावर आपला उद्वेग व्यक्त करण्याची भावना भाविकांची होती. त्याच पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीला नागपुरात ठिकठिकाणी महामृत्यूंजय मंत्राचा जाप सर्वत्र झाला. ओम नम: शिवाय, ओम त्र्यंबकम् यजामहे सुगंधीम पुष्टी वर्धनम्... या महामंत्राच्या गजराने नागपूरला महाशिवाच्या स्थळाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
स्मशानभूमी गजबजली भाविकांनी
आदी आणि अनंताची महादेवता म्हणून महाशिवाची ओळख आहे. त्यामुळे, सनातन धर्माच्या परंपरेनुसार प्रत्येक स्मशानभूमीमध्ये महाशिवाचा वास असतो आणि म्हणूनच स्मशानघाटांना महादेवाची आराधना करण्याचे परम् स्थान मानले जाते. त्याअनुषंगाने मोक्षधाम, गंगाबाई घाट, पारडी आदी शहरातील सर्व स्मशानभूमींवर भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. विविध संस्था, संघटना व संयोजकांकडून प्रसाद, पाणी, चहा वितरणाचे आयोजन करण्यात आले होते.
प्राचीन कल्याणेश्वर कल्याणेश्वर शिव मंदिर
शहरात दोन भोसलेकालिन प्राचीन कल्याणेश्वर शिव मंदिर आहेत. एक महालात आणि दुसरे तेलंगखेडीमध्ये. या दोन्ही शिवालयांमध्ये शिवतत्त्वाचा विशेष वास असतो, अशी भाविकांची धारणा आहे. त्याअनुषंगाने शिवलिंगच्या दर्शनासाठी या दोन्ही शिवालयांमध्ये भाविकांची सकाळपासून ते उत्तररात्रीपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.