कोविड- १९ च्या सर्व मार्गदर्शक सूचनांसह महामेट्रो प्रशासन तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 09:40 PM2020-06-27T21:40:59+5:302020-06-27T22:04:57+5:30
कोविडनंतर मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी महामेट्रो प्रशासन सज्ज झाले आहे. मेट्रो कर्मचारी आणि प्रवाशांसाठी सर्व खबरदारी म्हणून महामेट्रोतर्फे अनेक उपाययोजना करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविडनंतर मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी महामेट्रो प्रशासन सज्ज झाले आहे. मेट्रो कर्मचारी आणि प्रवाशांसाठी सर्व खबरदारी म्हणून महामेट्रोतर्फे अनेक उपाययोजना करण्यात येत आहे.
मेट्रो प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी महामेट्रोतर्फे गाड्यांचे नियमित निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. तसेच गर्दी असलेल्या मेट्रो स्थानकची वारंवार स्वच्छता केली जाईल. क्रू कंट्रोल रूम, बेबी केअर रूम आणि स्टेशन कंट्रोल रूम याठिकाणी सतत गर्दी असते. तेथील खोल्या वारंवार स्वच्छ केल्या जातील. याव्यतिरिक्त मेट्रो कर्मचारी पीपीई कीटसह, मास्क आणि हॅण्डग्लोव्हज घालून कार्यरत असतील. तसेच केंद्र आणि राज्य शासनाने कोविड-१९ महामारीकरिता वेळोवेळी जारी केलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्यात येईल. शासनाने जारी केलेले निर्देश प्रवाशांना आणि मेट्रो कर्मचाऱ्यांना नियमित सांगण्यात येईल. कोविड-१९ संबंधित जागरुकता नियमितपणे मेट्रो स्टेशन आणि मेट्रो गाड्यांमध्ये उपलब्ध असलेल्या स्पीकरवरून घोषणेद्वारे केल्या जातील. तसेच मेट्रो स्टेशन परिसरात प्रवाशांकरिता सूचना फलक लावण्यात येतील.
मेट्रो स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांना जागरूक करण्यात आले असून मेट्रो प्रवाशांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना पाळण्यास सांगितले आहे. मेट्रो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची खात्री करून देण्यासाठी मेट्रो अधिकारी या सर्व उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवतील.