महामेट्रोला मिळाले गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2022 08:21 PM2022-12-06T20:21:01+5:302022-12-06T20:22:31+5:30
Nagpur News भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामेट्रो यांनी उभारलेला महामार्ग उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वेसह सिंगल पिलरवर सपोर्ट केलेला सर्वात लांब ३.२४ किमीचा ‘डबलडेकर व्हायाडक्ट’ गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
नागपूर : संत्रानगरी म्हणून देशभरात ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहराचे नाव पुन्हा एकदा ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामेट्रो यांनी संयुक्तपणे उभारलेला महामार्ग उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वेसह सिंगल पिलरवर सपोर्ट केलेला सर्वात लांब ३.२४ किमीचा ‘डबलडेकर व्हायाडक्ट’ गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या लंडन मुख्यालयातील जज आणि निर्णायक ऋषीनाथ यांनी मंगळवारी व्हीआयपी रोडवरील मेट्रो भवनमध्ये आयोजित समारंभात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र सोपविले. या यशाबद्दल याआधी एका समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एनएचएआय आणि महामेट्रो टीमचे अभिनंदन केले आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, लंडन यांनी दिलेल्या निवेदनानुसार, महाराष्ट्रातील नागपूरमधील वर्धा रोडवरील ३.१४ किमी लांबीचा दुहेरी मार्ग ५ मार्च २०१९ रोजी मेट्रो रेल्वे वाहतुकीसाठी आणि १३ नोव्हेंबर २०२० रोजी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. कोणत्याही सर्वात लांब दुहेरी डेकर व्हायाडक्ट मेट्रो रेल्वे प्रणालीवर बांधण्यात आला आहे. याशिवाय या ३.१४ किमी लांबीच्या डबल डेकर व्हायाडक्टला आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने आशिया आणि भारतातील सर्वात लांब संरचना म्हणून आधीच प्रमाणित केले आहे. या मार्गावर छत्रपतीनगर, जयप्रकाशनगर आणि उज्ज्वलनगर अशी तीन स्टेशन्स आहेत. या प्रकल्पामुळे जमिनीची किंमत वाचली, तसेच बांधकामाचा वेळ आणि प्रकल्पाचा खर्च कमी झाला आहे.