महामेट्रो : प्रत्यक्षात उतरलेले सत्य अधिक सुंदर व आकर्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 10:14 PM2019-08-22T22:14:21+5:302019-08-22T22:15:49+5:30
नागपूर मेट्रोचे कार्य मूर्त रूप घेऊ लागले आणि कल्पनेतून साकारलेल्या चित्रापेक्षाही प्रत्यक्षात उतरलेले सत्य अधिक सुंदर व आकर्षक असल्याचे नजरेस येऊ लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ट्रान्सफॉर्मिंग नागपूर म्हणताना आपल्या शहरात कुठले बदल होतील याची उत्सुकता प्रत्येकाला लागून होती. याच अनुषंगाने महामेट्रो आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्थापत्य तज्ज्ञांकडून प्रत्येक महत्त्वाच्या इमारती, मार्गिका व स्टेशनचे डिझाईन तयार करून प्रसिद्ध केले होते. स्वप्नपूर्तीच्या या प्रवासाची चार वर्षे पूर्ण होतानाच नागपूर मेट्रोचे कार्य मूर्त रूप घेऊ लागले आणि कल्पनेतून साकारलेल्या चित्रापेक्षाही प्रत्यक्षात उतरलेले सत्य अधिक सुंदर व आकर्षक असल्याचे नजरेस येऊ लागले आहे.
प्रस्तावित डिझाईन प्रत्यक्षात साकारल्यानंतर सत्य आणि कल्पना शेजारी ठेवल्यावर यातील फरक ठळकपणे लक्षात येताच त्याच अनुषंगाने संलग्नित चित्र हे व्हेरायटी चौकातल्या मार्गिकेचे असून त्यात शहराची हृदयलाईन समजल्या जाणाऱ्या शहीद गोवारी उड्डाण पुलावरून शहराचा मान ठरलेली माझी मेट्रो क्रॉस करीत असल्याचे चित्र साकारले गेले होते. हे चित्र सुंदर होते, मात्र हे चित्र प्रत्यक्षात मूर्त रूपात उतरल्यानंतर व्हेरायटी चौक येथील कार्य हुबेहूब उतरले किंबहुना चित्रापेक्षाही अधिक अत्याधुनिक व आकर्षक असल्याचे निदर्शनास आले आहे.
महामेट्रोद्वारे निर्माण होणाऱ्या स्थानकांच्या इमारती, पिलर, पूल, डबल डेकर यांच्या डिझाईन तुलनेने भिन्न असून त्यावर होणारी रंगरंगोटी आणि प्रकाशयोजनेमुळे फक्त तेवढा परिसरच नाही तर एकंदरीतच शहराचे रूप सुंदर होऊ लागले आहे. बाहेरून नागपूर शहराकडे येणारे व्यापारी आणि पर्यटकांसाठी हे शहर आता आकर्षणाचे केंद्र ठरू लागले आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक प्रबळ झाल्याने पुढल्या काही काळात येथील व्यवसायालाही अधिक सुगीचे दिवस येण्याची अपेक्षा आहे. सीताबर्डी परिसरात नागपूर मेट्रोचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.
आदिवासी गोवारी शहीद उड्डाण पुलावर स्टील गर्डर ब्रिजचे काम सुरक्षिततेची काळजी घेत पूर्ण केले. या पुलाचे प्रस्तावित डिझाईन जसे होते त्याहून अधिक प्रत्यक्षात बांधकामानंतरचा पूल आकर्षक आणि देखणा झाला आहे. रस्त्यापासून १८.५ मी. उंच असलेल्या या पुलावरून मेट्रो जात असताना पाहणे प्रवाशांसाठी आनंदाचे ठरत असून या चित्राने शहराचे सौंदर्य अधिकच वाढले आहे.