स्टेशन रोडवर धूळ खाताहेत महामेट्रोची दुकाने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:08 AM2021-07-08T04:08:24+5:302021-07-08T04:08:24+5:30
फोटो... समाचार... आनंद शर्मा नागपूर : नागपूर स्टेशन रोडच्या कायाकल्प प्रकल्पाकरिता गणेश टेकडी मंदिरासमोरील उड्डाणपूल पाडून त्याखालील दुकानदारांना स्थानांतरित ...
फोटो... समाचार...
आनंद शर्मा
नागपूर : नागपूर स्टेशन रोडच्या कायाकल्प प्रकल्पाकरिता गणेश टेकडी मंदिरासमोरील उड्डाणपूल पाडून त्याखालील दुकानदारांना स्थानांतरित करण्याच्या उद्देशाने महामेट्रोने स्टेशन रोडवर बांधलेल्या ७२ अस्थायी दुकानांमध्ये जाण्यास दुकानदारांनी चक्क नकार दिल्याने सध्या ही दुकाने धूळ खात आहेत.
गणेश टेकडी पुलाखालील दुकानदारांसाठी मॉल बांधून त्या ठिकाणी दुकाने देण्यात येणार आहे. पण तत्पूर्वी प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांना अस्थायीरीत्या हटवून एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रण कार्यालयाच्या जागेवरील दुकानांमध्ये स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. महामेट्रोने बांधकाम विभागाच्या मदतीने अस्थायी दुकाने बांधली आहेत. पण एक वर्षापासून ही दुकाने धूळ खात आहेत. या दुकानात स्थानांतरित होण्यावर टेकडी पुलाच्या दुकानदारांमध्ये दोन गट पडले आहेत. एक गट जाण्यास इच्छुक आहे तर, दुसरा गट विविध मागण्या करीत आहे. त्यामुळे स्टेशन रस्त्याच्या कायाकल्प प्रकल्पाचे काम अडकले आहे.
प्राप्त माहितीनुसार, मनपाने पूर्वी गणेश टेकडी पुलाखाली १७२ दुकाने बांधली. त्यापैकी ७२ दुकाने जुने अर्थात आरक्षित दुकानदार आणि १०० दुकाने नवीन दुकानदारांना दिली. मनपाने या दुकानदारांकडून लाखो रुपये गोळा केले आहेत. पण आता स्टेशन रोडच्या कायाकल्प प्रकल्पासाठी टेकडी उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. अशास्थितीत या दुकानदारांना स्थानांतरित करण्यासाठी एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालय परिसरात सध्या ७२ अस्थायी दुकाने बांधली आहेत. जवळपास अर्धे दुकानदार जाण्यास तयार नाहीत. ते दुकानाचा चारपट मोबदला, दुकानदारांचे योग्य पुनर्वसन आणि मॉलसारखी इमारत बांधून स्थानांतरित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे महामेट्रो आणि मनपा प्रशासन असहाय दिसत आहे. यामुळे पूर्वीप्रमाणे पुढेही कायाकल्प प्रकल्प वादात अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महामेट्रो, मनपाची बैठक विफल
याप्रकरणी महामेट्रो आणि मनपाच्या अधिकाऱ्यांनी टेकडी पुलाखालील दुकानदारांसोबत काही दिवसापूर्वी बैठक घेतली. बैठकीत दुकानदार दोन गटात विभागले. एका गटाने स्थानांतरित होण्यास मान्यता दिली तर, दुसरा गट आपल्या मागण्यांवर अडून राहिला. अधिकाऱ्यांचीही विनंती त्यांनी धुडकावली. याप्रकरणी दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मौन धारण केले आहे.
अस्थायी दुकाने तयार
टेकडी पुलाखालील दुकानदारांना स्थानांतरित करण्यासाठी एसटी महामंडळाच्या जागेवर महामेट्रोने दुकाने बांधून दिली आहेत. दुकानदारांना स्थानांतरित करण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे.
- अखिलेश हळवे, उपमहाव्यवस्थापक (कॉर्पोरेट जनसंपर्क), महामेट्रो.
पुन्हा बैठक घेणार
एसटी महामंडळाच्या जागेवर स्थानांतरित करण्यासाठी टेकडी पुलाखालील दुकानदारांची समजूत घालण्यात येणार असून, या मुद्यावर मनपातर्फे पुन्हा बैठक घेण्यात येईल.
- श्रीकांत वैद्य, बाजार अधीक्षक, मनपा.