महामेट्रो तयार करणार तेलंगणा राज्यासाठी मेट्रो नियोचा डीपीआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 10:40 PM2019-12-10T22:40:27+5:302019-12-10T22:42:57+5:30
तेलंगणा सरकारने ९ डिसेंबर रोजी हैदराबाद येथे घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत वारंगल शहराकरिता मेट्रो नियो प्रकल्पाच्या डीपीआर तयार करण्याचे कार्य महामेट्रोला देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तेलंगणा सरकारने ९ डिसेंबर रोजी हैदराबाद येथे घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत वारंगल शहराकरिता मेट्रो नियो प्रकल्पाच्या डीपीआर तयार करण्याचे कार्य महामेट्रोला देण्यात आले. यासंदर्भात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित व संचालक (प्रकल्प) महेश कुमार यांनी तेलंगणा राज्याचे पालिका प्रशासन व नगरविकास मंत्री के. टी. रामाराव, प्रधान सचिव अरविंद कुमार आणि तेलंगणा राज्याचे इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर मेट्रो नियो प्रकल्पाचे सादरीकरण केले.
सादरीकरणानंतर के. टी. रामाराव यांनी वारंगल जिल्ह्याकरिता १० ते १५ किमी रबर टायर मेट्रो प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्याची विनंती केली. पारंपरिक व्यवस्थेच्या तुलनेत फक्त एकतृतीयांश खर्च या प्रकल्पामध्ये होणार असून, महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्याव्यतिरिक्त वारंगल जिल्ह्यात हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.
इतर राज्यामध्ये पारंपरिक पद्धतीने मेट्रो प्रकल्प राबविण्याची किंमत २५० कोटी प्रति किमी असून, महामेट्रोद्वारे राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पाची किंमत १८० कोटी प्रति किमी इतकी आहे. मेट्रो नियो प्रकल्प राबविण्याकरिता ७२ कोटी प्रति किमी एवढा खर्च येणार आहे.
१९ नोव्हेंबर २०१९ रोजी तेलंगणा राज्याच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने नागपूर मेट्रो प्रकल्पाचा दौरा करून डबलडेकर उड्डाणपूल आणि नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पाहणी केली होती. शिष्टमंडळाने प्रकल्पाच्या कार्याची प्रशंसा करीत तेलंगणा राज्यात निर्माणाधीन व प्रस्तावित प्रकल्पात असे निर्माणकार्य व्हावे, यासाठी महामेट्रोने सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तेलंगणा राज्याच्या शिष्टमंडळाने नागपूर मेट्रोच्या दौऱ्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महामेट्रोने तयार केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या सादरीकरणासाठी महामेट्रोला निमंत्रित केले होते.