महामेट्रोच्या झिरो माईल्स, कस्तूरचंद पार्क स्टेशन व फ्रीडम पार्कचे आज उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:12 AM2021-08-20T04:12:22+5:302021-08-20T04:12:22+5:30
नागपूर : महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत सीताबर्डी-झिरो माईल्स-कस्तूरचंद पार्क मार्गाचे उद्घाटन शुक्रवार, २० ऑगस्टला दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ...
नागपूर : महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत सीताबर्डी-झिरो माईल्स-कस्तूरचंद पार्क मार्गाचे उद्घाटन शुक्रवार, २० ऑगस्टला दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृह निर्माण, नागरी सुविधा, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते होणार आहे. हा सोहळा झिरो माईल पार्क मेट्रो स्टेशनवर पार पडणार आहे.
१.६ किमी लांब या मार्गाच्या उद्घाटनांतर्गत झिरो माईल स्टेशन आणि कस्तूरचंद पार्क व फ्रीडम पार्कचेदेखील उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आभासी पद्धतीने (व्हिडिओ लिंकद्वारे) या कार्यक्रमात सहभागी होतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जा मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी या सोहळ्याला उपस्थित राहतील. केंद्रीय नागरी विकास व गृहनिर्माण मंत्रालयाचे सचिव व महामेट्रोचे अध्यक्ष दुर्गा शंकर मिश्रा हे देखील आभासी पद्धतीने संबोधन करतील. या सोहळ्याला नागपूर शहरातील आणि जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित राहतील.
सीताबर्डी ते झिरो माईल फ्रीडम पार्क आणि पुढे कस्तूरचंद पार्कपर्यंतची प्रवासी सेवा २० ऑगस्टला दुपारी ३ पासून सुरू होईल. खापरीहून येणाऱ्या गाड्या आता सीताबर्डीऐवजी कस्तूरचंद पार्क येथे संपतील. त्याचप्रमाणे, खापरीसाठी गाड्या सीताबर्डीऐवजी नवीन स्थानकावरून सुटतील.