कोरोनामुळे नागपुरातील महाराज बाग प्राणिसंग्रहालयाला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 11:57 AM2020-03-16T11:57:17+5:302020-03-16T11:58:21+5:30
बालगोपाल आणि शहरातील पर्यटकांना वन्यप्राण्यांचे दर्शन घडविणारे महाराजबाग प्राणिसंग्रहालय कोरोनामुळे सोमवारपासून बंद करण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत ते बंद ठेवले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बालगोपाल आणि शहरातील पर्यटकांना वन्यप्राण्यांचे दर्शन घडविणारे महाराजबाग प्राणिसंग्रहालय कोरोनामुळे सोमवारपासून बंद करण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत ते बंद ठेवले जाणार आहे.
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. हा आदेश १६ मार्चपासून अमलात आणायचा असला तरी प्रत्यक्षात रविवारीपासूनच या प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लागलेले दिसले. रविवार सुटीचा दिवस असल्याने या ठिकाणी गर्दी होते. मात्र कुलूप पाहून आणि प्रवेशद्वारावरील सूचना वाचून सर्वांनाच परत जावे लागले.
महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर यांना यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, या प्राणिसंग्रहालयात दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येतात. देशातील कोरोनाची आपदा लक्षात घेता, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने राज्यातील सर्व प्राणिसंग्रहालये बंद करण्याचे आदेश १३ मार्चच्या पत्रातून दिले होते. महाराजबाग प्राणिसंग्रहालयालाही हे पत्र मिळाल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
शहरामध्ये वन विभागाने निर्माण केलेले बालोद्यान आणि जपानी गार्डनही आहे. तिथेही पर्यटकांची दररोज मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र या दोन्ही ठिकाणी बंदीचा आदेश अमलात आणलेला नाही. यासंदर्भात जिल्ह्याचेउपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांना विचारणा केली असता, संबंधित समितीच्या बैठक ीनंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.