रेल्वेच्या 'सॅग लेवल कमिटी'कडून बल्लारपूर रेल्वे पूल दुर्घटनेची चाैकशी
By नरेश डोंगरे | Published: November 28, 2022 09:53 PM2022-11-28T21:53:43+5:302022-11-28T21:54:23+5:30
संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे संकेत
नागपूर : बल्लारपूर रेल्वेस्थानकावरील पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेची रेल्वे मुख्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेच्या मुख्यालयातून या दुर्घटनेची चाैकशी करण्यासाठी वरिष्ठ प्रशासकीय श्रेणी (सॅग)स्तराची समिती नियुक्त करण्यात आली आहे. चाैकशी समितीतील सदस्यांची नावे अद्याप स्पष्ट करण्यात आली नाही. मात्र, मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयासह, नागपूर विभागातील रेल्वे अधिकाऱ्यांचा या चाैकशी समितीत समावेश असणार आहे.
भारताच्या दक्षिण प्रांताला जोडणाऱ्या बल्लारपूर रेल्वे स्थानकावरच्या या पादचारी पुलाने रविवारी सायंकाळी एका महिलेचा बळी घेतला तर १६ प्रवाशांना जबर जखमी केले. या दुर्घटनेचे हादरे आणि किंकाळ्या रेल्वे मंत्रालयापर्यंत पोहचल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने त्याची गंभीर दखल घेतल्याने मध्य रेल्वे प्रशासनानेही आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. विभागस्तरावरचे वरिष्ठ अधिकारी, ५० कंत्राटी तर, ४० विभागीय कामगार आणि १० पर्यवेक्षक असे एकूण १०० जणांचे पथक रविवार सायंकाळपासून बल्लारपुरात युद्धस्तरावर दुरूस्तीचे काम करीत आहे. दुसरीकडे मध्य रेल्वे मुख्यालय मुंबईने सिनियर ॲडमिनिस्ट्रेटीव्ह ग्रेडच्या (वरिष्ठ प्रशासकीय श्रेणी) अधिकाऱ्यांची एक चाैकशी समितीला या दुर्घटनेच्या चाैकशीचे आदेश दिले आहे.
पूल किती वर्षे जुना होता, त्याची देखभाल कशा पद्धतीने केली जात होती, त्या देखभालीत काय कसूर झाला आणि या कर्तव्य कसुरीला कुणाकुणाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे, त्याची चाैकशी ही समिती करणार आहे. या चाैकशी समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे संबंधितांना दोषी धरले जाणार आहे. या दोषींवर रेल्वेकडून प्रथमदृष्ट्या निलंबनाचा आसूड ओढला जाऊ शकतो. दरम्यान, कारवाईचे संकेत मिळाल्याने संबंधित अधिकाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना
या चाैकशी समितीसोबतच मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यापुढे अशी दुर्घटना होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी, त्यासंबंधानेही विचारमंथन केले जाणार आहे. त्याआधारे वेगवेगळ्या उपाययोजनांची यादी वजा अहवाल शिर्षस्थांकडे सादर केला जाणार आहे. लवकरच रेल्वे प्रशासनाकडून सेफ्टी ड्राईवही चालविला जाणार आहे.