राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
By योगेश पांडे | Published: November 2, 2024 07:04 PM2024-11-02T19:04:06+5:302024-11-02T19:06:28+5:30
राज्यात निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधानांच्या १० प्रचार सभांचे नियोजन करण्यात आले आहे.
नागपूर : विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज दाखल झाल्यानंतर बहुतांश ठिकाणी लढतींचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह हे सर्वात मोठे स्टार प्रचारक ठरणार आहेत. राज्यात निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधानांच्या १० प्रचार सभांचे नियोजन करण्यात आले आहे. ८ नोव्हेंबरपासून त्यांच्या प्रचार सभांना सुरुवात होईल.
दिवाळीनंतर आता प्रचाराचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे. भाजपकडून स्टार प्रचारकांची यादीच जाहीर करण्यात आली असून विविध केंद्रीय मंत्रीदेखील प्रचारात उतरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना ८ नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. सर्वात अगोदर धुळे व नाशिक येथे सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अकोला व नांदेड येथे त्यांची सभा होईल. तर १२ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर, सोलापूर व पुणे येथे सभांचे आयोजन करण्यात आले आहे. १४ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती संभाजीनगर, मुंबई व नवी मुंबई येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. सद्यस्थितीत दहा सभांचे नियोजन करण्यात आले असले तरी यात वाढ होण्याची देखील शक्यता आहे. प्रत्येक सभा ही संबंधित जिल्हा किंवा क्षेत्रातील १५ ते २० मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणारी असेल व तेथील सर्व उमेदवार सभास्थळी राहतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.