Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात २२९ व्हीव्हीपॅट, ५० च्यावर ईव्हीएम मशीन पडल्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 08:42 PM2019-10-21T20:42:45+5:302019-10-21T20:43:25+5:30
नागपूर जिल्ह्यात १२ मतदार संघात मतदानादरम्यान २२९ च्यावर व्हीव्हीपॅट मशीन्स आणि ५० च्यावर ईव्हीएम मशीन्स खराब झाल्या. मतदान प्रक्रिया बराच काळ खोळंबल्याने मतदारांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ईव्हीएम मशीन्सद्वारे मतदान प्रक्रिया सुलभ, सुरक्षित व गतिमान होते, असा दावा केला जातो, मात्र सोमवारी मतदानाच्या दिवशी या दाव्याला खीळ बसली. नागपूर जिल्ह्यात १२ मतदार संघात मतदानादरम्यान २२९ च्यावर व्हीव्हीपॅट मशीन्स आणि ५० च्यावर ईव्हीएम मशीन्स खराब झाल्या. एवढ्या मोठ्या संख्येत बंद पडलेल्या मशीन्सना वेळेवर बदलविण्यात आले. मात्र या कारवाईत मतदान प्रक्रिया कुठे काही काळ तर कुठे बराच काळ खोळंबल्याने मतदारांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
नागपूर जिल्ह्यातील सर्व बारा विधानसभा क्षेत्रात मतदानादरम्यान मोठ्या प्रमाणात ईव्हीएम खराब झाल्याचा प्रकार समोर आला. मतदानासाठी आदल्या दिवशीच या मशीन्स केंद्रावर पोहचविण्यात आल्या होत्या. नियमानुसार प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान सुरू होण्यापूर्वी ट्रायलसाठी मॉकपोल घेण्यात येतो. अशा मॉकपोलच्या वेळीच विविध केंद्रावर तब्बल २२ बॅलेट युनिट, ३८ कंट्रोल युनिट आणि ७१ व्हीव्हीपॅट मशीन खराब निघाल्या. या सर्व मशीन तात्काळ बदलण्यात आल्या. प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेच्यावेळीही अनेक मशीन खराब झाल्या. मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान विविध केंद्रावर २३ बॅलेट युनिट, १८ कंट्रोल युनिट आणि १५८ व्हीव्हीपॅट मशीन खराब झाल्या. अशाप्रकारे २२९ व्हीव्हीपॅट, ४५ बॅलेट युनिट व ५६ कन्ट्रोल युनिट खराब निघाले. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार ५ वाजतापर्यंत नोंदविण्यात आला. विविध मतदार संघाचा विचार केल्यास दक्षिण नागपूर मतदार संघात सर्वाधिक ६ बॅलेट युनिट, ३ कंट्रोल युनिट तर १२ व्हीव्हीपॅट मशीन बदलाव्या लागल्या. सावनेर मतदार संघात २३ व्हीव्हीपॅट, प्रत्येकी एक-एक बॅलेट व कंट्रोल युनिट बदलण्यात आले. हिंगणा मतदार संघात प्रत्येकी ४-४ बॅलेट, कंट्रोल युनिट तर २० व्हीव्हीपॅट मशीन बदलाव्या लागल्या. रामटेक मतदार संघातही २० व्हीव्हीपॅट, २-२ कंट्रोल व बॅलेट युनिट बदलाव्या लागल्या. नियमानुसार नवीन मशीन बदलविताना पुन्हा मॉक पोल घ्यावे लागते. यामुळे मशीन्स बदलविताना लागणारा वेळ आणि मॉकपोलचा वेळ यात बराच वेळ जातो. यामुळे मतदानावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे.
ईव्हीएम हॅक होत असल्याचा दावा विरोधी पक्षांकडून करून त्याच्यावर बॅन घालून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करण्यात आली होती. निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारकडून विरोधकांचा दावा फेटाळून लावण्यात आला. ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असून कुणीही हॅक करू शकत नाही, असा दावा त्यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे लोकसभेनंतर महाराष्ट्र विधानसभेतही ईव्हीएम द्वारेच मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला, हे विशेष.
मॉईश्चरमुळे मशीन खराब झाल्याचा दावा
दरम्यान, निवडणूक प्रशासनाने मोठ्या प्रमाणात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्स खराब होण्यासाठी मॉईश्चरला कारणीभूत धरले आहे. पावसाचे वातावरण असल्याने मॉईश्चरमुळे मशीन्स खराब झाल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र व्हीव्हीपॅट मशीन खराब झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.