Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात मतदानासाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 09:17 PM2019-10-19T21:17:45+5:302019-10-19T21:22:09+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी सोमवार २१ तारखेला मतदान होणार आहे. मतदानासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असून प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवार २१ तारखेला मतदान होणार आहे. मतदानासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असून प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकोश ओला, विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा उपस्थित होते.
निवडणुकीसाठी एकूण १७ हजारावर निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यांचे दोन प्र्रशिक्षण पूर्ण झाले असून, तिसरे प्रशिक्षण उद्या होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील तब्बल ८९ टक्के मतदारांपर्यंत व्होटर स्लीप पोहोचलेल्या आहेत. मतदान केंद्रांवर मतदारंसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंध, अपंग दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअरसह विशेष व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत.
यंदा मतदान केंद्रांवर बसण्याची व्यवस्थाही
मतदान केंद्रांवर मतदानासाठी मोठी रांग असते. मतदारांना साधी बसायचीही सुविधा नसते, हे नेहमीचेच चित्र आहे. परंतु यंदा मतदान केंद्रांवर मतदारांना बसण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी तशी माहिती दिली.
मतदारांच्या माहितीसाठी ‘व्होटर गाईड’
मतदान करण्याच्या प्रक्रियेची माहिती व्हावी, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर ‘व्होटर गाईड’ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतदान कसे करावे, यासोबतच ईव्हीएम कसे काम करते, याची माहितीही यावर राहणार आहे.
४४३ मतदान केंद्राच्या ठिकाणी वेब कास्टिंग
जिल्ह्यात एकूण ४,४१२ मतदान केंद्र आहेत. त्यापैकी ४४३ ठिकाणी वेब कास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये त्या मतदान केंद्रावर घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर थेट लक्ष राहील. त्याचे केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात राहील.
एक्झीट पोलला मनाई
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एक्झीट पोलला मनाई आहे. कुणीही एक्झीट पोल दाखविल्यास कारवाई केली जाईल.
जमावबंदी कायदा लागू
निवडणूक प्रचार संपला आहे. आता केवळ घरोघरी जाऊन संपर्क करता येईल. परंतु पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. नागपुरात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे.