Maharashtra Assembly Election 2019 : बावनकुळे यांना यापेक्षा मोठे पद मिळेल : मुख्यमंत्र्यांचे अभिवचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 08:20 PM2019-10-18T20:20:32+5:302019-10-18T20:23:55+5:30
बावनकुळे हे आमच्या पक्षाचे हिरा आहेत. त्यांच्या भवितव्याची जबाबदारी आमची आहे. भविष्यात त्यांना यापेक्षाही मोठे पद देऊ, असे अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी कन्हान (नागपूर) येथील जाहीर सभेत दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत चिंता करण्याचे काहीच कारण नाही. बावनकुळे हे आमच्या पक्षाचे हिरा आहेत. त्यांच्या भवितव्याची जबाबदारी आमची आहे. भविष्यात त्यांना यापेक्षाही मोठे पद देऊ, असे अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी कन्हान (नागपूर) येथील जाहीर सभेत दिले.
कामठी मतदारसंघात उमेदवारी वाटपाच्या वेळी महानाट्य घडले. शेवटच्या क्षणी बावनकुळे यांना तिकीट मिळाले नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. त्याचे पडसाद विदर्भातही उमटले. यात अंतर्गत राजकारण झाले अशा विविध अफवा, वावड्या निर्माण झाल्या. परंतु असे काही नसल्याचे दोन दिवसात स्पष्ट झाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बावनकुळे यांची पूर्व विदर्भ प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती केली. या माध्यमातून बावनकुळे यांच्याकडे ३२ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली.
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम विदर्भातील जाहीर सभांमध्ये बावनकुळेंना बोलावून घेतले होते. धारणी, कारंजा आणि चिखलीच्या सभांमध्ये बावनकुळे यांना शहा यांनी पूर्णवेळ सोबत ठेवले ठेवले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही बावनकुळे यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, लवकरच त्यांचे पुनर्वसन करण्याचा शब्द मी देतो, असे जाहीर सभांमध्ये सांगितले.
कन्हानच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काही लोक सांगतात बावनकुळेंचे तिकीट कापले, त्यांचे काय होणार? जे लोक मगरीचे अश्रू वाहत आहेत त्यांना मी सांगून देतो, बावनकुळेंची चिंता तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही. बावनकुळे आहेत त्यापेक्षा मोठे झालेले दिसतील. त्यांची चिंता करण्याची आवश्यकता नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठासून सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या उघड पाठबळामुळे बावनकुळे यांच्या समर्थकांना भविष्यातील शुभसंकेतच मिळाले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.