Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनो दक्ष राहा : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 10:21 PM2019-10-09T22:21:19+5:302019-10-09T22:22:54+5:30
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरु असून, निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिक प्रयत्न करावेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरु असून, निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिक प्रयत्न करावेत. पुढील काही दिवस अत्यंत जबाबदारीने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत दक्ष राहा, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवीद्र ठाकरे यांनी दिल्यात.
बुधवारी बचत भवन सभागृहात निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, पोलीस अधीक्षक राकेश ओला, निवडणूक खर्च निरीक्षक सुब्राज्योती चक्रवर्ती, गौतम पात्रा, दुर्गविजय सिंह, प्रसन्था एन., जयसिंह, चंद्र्रप्रकाश वर्मा, राजेश शर्मा, सुरेश चंद्र्र, शशी भूषण, प्रतिक कुमार सिंह आणि ऐलानचेझीएन, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा हे उपस्थित होते.
यावेळी निवडणूक खर्च निरीक्षकांनी नागपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि नोडल अधिकारी यांच्याकडून निवडणूकविषयक कामकाजाचा आढावा घेतला. तसेच संबंधित नोडल अधिकाºयांना विविध सूचना केल्या.
यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नागपूर जिल्ह्यात ग्रामीण सहा विधानसभा मतदारसंघात पोलीस यंत्रणेकडून राबविण्यात येत असलेल्या विशेष प्रतिबंधात्मक कार्यवाहीबाबत माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील आंतरराज्यीय तपासणी नाके, मद्यविक्री, रोख रक्कम यांची होणारी वाहतूक आदीबाबत पोलीस यंत्रणेने केलेल्या प्रतिबंधात्मक कार्यवाहीबाबत निवडणूक निरीक्षकांना माहिती दिली.
सायबर सेलच्या नोडल अधिकारी उपायुक्त श्वेता खेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामांची माहिती आणि आता विधानसभा निवडणुकीत सायबर सेलकडून केली जाणारी प्रक्रिया याबाबतची माहिती दिली. तसेच सी-व्हीजील अॅपवर मतदारांकडून येणाºया तक्रारी, त्यावरील होत असलेली दैनंदिन कार्यवाही याबाबतची माहिती दिली. तसेच निवडणुका निर्भय आणि मुक्त तसेच पारदर्शी वातावरणात पार पाडाव्यात यासाठी शहर पोलीस यंत्रणेकडून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
यावेळी जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून करण्यात येत असलेल्या मजकुराचे प्रमाणीकरण आणि पेड न्यूज तसेच सायबर सेलकडून येणाºया तक्रारींच्या कामाची माहितीही नोडल अधिकारी अनिल गडेकर यांनी निवडणूक निरीक्षकांना दिली.