Maharashtra Assembly Election 2019 :विश्वास ठेवा, दिलेली आश्वासने १०० टक्के पूर्ण करेन : आशिष देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 09:50 PM2019-10-19T21:50:59+5:302019-10-19T21:57:00+5:30
लोकमत न्यून नेटवर्क नागपूर : नागपूर शहर पारंपरिकरीत्या काँग्रेसच्या विचारसरणीवर चालणारे आहे. फुले, शाहू, आंबेडकर व महात्मा गांधींची विचारसरणी ...
लोकमत न्यून नेटवर्क
नागपूर : नागपूर शहर पारंपरिकरीत्या काँग्रेसच्या विचारसरणीवर चालणारे आहे. फुले, शाहू, आंबेडकर व महात्मा गांधींची विचारसरणी हीच काँग्रेसची विचारसरणी आहे. त्यामुळे नागपूरची जनता पुनश्च काँग्रेससोबत उभी राहिलेली दिसेल, असा विश्वास व्यक्त करीत विकासाचे मिशन, व्हिजन, इज ऑफ लिव्हिंग यासंदर्भात आपण लोकांना दिलेली वचने १०० टक्के पूर्ण करू, असे आश्वासन दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे डॉ. आशिष देशमुख यांनी दिले.
शनिवारी १९ ऑक्टोबरला सकाळी दीक्षाभूमी येथून डॉ. आशिष देशमुख यांच्या महारॅलीला प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत मुकुल वासनिक, प्रकाश गजभिये, प्रफुल्ल गुडधे पाटील, राकेश पन्नासे आदींसह जनसमुदाय उपस्थित होता. या महारॅलीने नीरी, अजनी, लोकमत चौक, धंतोली, घाट रोड, गणेशपेठ बसस्टँड, जाटतरोडी, आंबेडकर चौक, पार्वतीनगर, शताब्दी चौक, मनीषनगर व लगतचा परिसर दणाणून सोडला.
जनसंपर्कादरम्यान देशमुख म्हणाले, आर्थिक संपन्नता प्रत्येक घरापर्यंत पोहचविणे हा आपला शब्द आहे. आपण नागपुरात राहणारे उमेदवार आहोत, त्यामुळे जनतेच्या नेहमी संपर्कात राहणार आहे. समस्या जाणून सोडविण्यासाठी आणि नागपूरच्या विकासासाठी प्रत्येक दिवस काम करणार आहे.
ते पुढे म्हणाले, भारताची अर्थव्यवस्था घसरली. चुकीच्या पद्धतीने लागू केलेली जीएसटी, नोटाबंदी यामुळे व्यापारीवर्ग भाजपवर नाराज आहे. रोजच्या मिळकतीमध्ये घट झाल्यामुळे या वर्गाचा भाजपाच्या धोरणांवर रोष आहे. एकूण मतदारांपैकी ५० टक्के मतदार ३५ वर्षांखालील आहेत. भाजपकडे वळलेला तरुण मतदार बेरोजगारीमुळे कमालीचा त्रस्त आहे. स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्र, मुद्रा योजना यातून त्यांच्या हाताला काम मिळाले नाही. त्यांचा स्वयंरोजगार सुरू झाला नाही. या सर्व समस्यांवर आपल्या व्हिजनमध्ये उत्तर असल्याचे सांगत, त्यांनी मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाची हमी दिली.