Maharashtra Assembly Election 2019 : भाजपने चुकीची धोरणे राबविली : आनंदराज आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 11:49 PM2019-10-15T23:49:34+5:302019-10-15T23:52:59+5:30
भाजपने मागील पाच वर्षांत चुकीचे धोरण राबवून प्रगतिपथावर असलेला आपला देश भिकेला लावला असल्याची जाहीर टीका रिपब्लिकन सेनाचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी येथे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपने मागील पाच वर्षांत चुकीचे धोरण राबवून प्रगतिपथावर असलेला आपला देश भिकेला लावला असल्याची जाहीर टीका रिपब्लिकन सेनाचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी येथे केली.
वंचित बहुजन आघाडीच्या नागपूर दक्षिण-पश्चिम व नागपूर दक्षिणमधील उमेदवाराच्या प्रचारार्थ मंगळवारी चंद्रमणीनगर उद्यानजवळ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पक्षाचे ज्येष्ठ नेते राजू लोखंडे, रवि शेंडे, रमेश पिसे, अरुण गाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
आनंदराज आंबेडकर म्हणाले, देश आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत होता. परंतु आज परिस्थिती अशी झाली आहे की, सरकारला रिझर्व्ह बँकेकडून पैसे घ्यावे लागत आहे. देशाला हजारो-लाखो कोटी रुपयांचा नफा कमवून देणाऱ्या नवरत्न कंपन्या विकायल्या काढल्या आहेत. देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बीएसएनएल अंबानीच्या घशात घालण्याचे कारस्थान सुरू आहे. हा भ्रष्टाचार रोखायचा असेल तर परिवर्तन करावे लागेल. महाराष्ट्राचीही पत घसरली आहे. पहिल्या क्रमांकावर असलेले राज्य आज तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर गेले आहे. राज्यावर पाच लाख कोटीचे कर्ज आहे. दोन कोटी रोजगार हिरावल्या गेले आहेत. लोकांना मूर्ख बनविण्याचे काम सुरू असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
भाजप बहुमताने निवडून येण्याचा दावा मुख्यमंत्री करतात. त्यांना विजयाची इतकीच खात्री आहे तर मग प्रचारासाठी पंतप्रधानांपासून सर्व मंत्री आणि देशातील विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांना का बोलवावे लागत आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला.