Maharashtra Assembly Election 2019 : परदेशातूनही फडणवीस यांच्यासाठी होतोय प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 10:18 PM2019-10-18T22:18:39+5:302019-10-18T22:19:04+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभरात प्रचारात व्यस्त असून, त्यांच्या कार्याने प्रभावित कार्यकर्ते स्वत:हून त्यांच्यासमवेत येत आहेत. केवळ राज्यातच नव्हे तर अगदी सातासमुद्रापलीकडेदेखील फडणवीस यांच्यासाठी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने प्रचार सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभरात प्रचारात व्यस्त असून, त्यांच्या कार्याने प्रभावित कार्यकर्ते स्वत:हून त्यांच्यासमवेत येत आहेत. केवळ राज्यातच नव्हे तर अगदी सातासमुद्रापलीकडेदेखील फडणवीस यांच्यासाठी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने प्रचार सुरू आहे. अमेरिकेत तर अनिवासी भारतीयांपर्यंत फडणवीस सरकारची कामे पोहोचविण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय अनेक अनिवासी भारतीय तेथून फडणवीस यांच्या कामाचा प्रचार-प्रसार करीत आहेत.
कॅलिफोर्निया येथील मिल्पिटास येथे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात मागील पाच वर्षांत झालेल्या कामांवर प्रकाश टाकण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र मंडळासह विविध संघटनांचे सदस्य उपस्थित होते. याशिवाय लॉस एंजेलिस, न्यू जर्सी, वॉशिंग्टन डीसी, शिकागो, होस्टन, ऑस्टिन येथेदेखील अशाप्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांची कार्यप्रणाली तसेच राज्याचा बदललेला चेहरा यावरदेखील यात चर्चा झाली.
‘महाराष्ट्र मॉडेल’ची चर्चा
‘एनआरआय’मध्ये निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या सद्यस्थितीवर चर्चा घडवून आणण्यात आली. यात प्रशासकीय कामासंदर्भात ‘महाराष्ट्र मॉडेल’चे कौतुक झाले. मागील पाच वर्षांत राज्याची प्रगती झाली असून राज्य सुरक्षित झाले आहे. याशिवाय पायाभूत सुविधांचा विकास होत असल्याने गुंतवणूक येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे मत ‘एफआयआयडीएस’चे (फाऊंडेशन ऑफ इंडिया अॅन्ड इंडियन डायस्पोरा स्टडीज) संचालक खंडेराव कांड यांनी व्यक्त केले.
‘सोशल मीडिया’वर राज्याची महती
देवेंद्र फडणवीस यांची विदेशामध्ये चांगली प्रतिमा आहे. त्यांनी पाच वर्षांत केलेल्या कामगिरीच्या आधारावर विदेशात असलेले महाराष्ट्रातील अनेक तरुण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून राज्याची महती जगापर्यंत पोहोचवत आहेत, अशी माहिती नॉर्दन कॅलिफोर्निया येथे वास्तव्याला असलेले आयटी तंत्रज्ञ गौरव पटवर्धन यांनी दिली. अनेक तरुणांनी तर फडणवीस यांच्या कामावर प्रकाश टाकणारे ‘व्हिडीओ’, ‘ग्राफिक्स’ तयार केले आहेत. ते ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील मित्रमंडळीपर्यंत पोहोचविण्यार भर देण्यात येत आहे. अनेक जण तर कुठल्याही पक्षाशी जुळलेले नाहीत. परंतु राज्याच्या विकासासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या कामावर प्रकाश टाकण्यासाठी अमेरिकेत आयोजित सभा