Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील सदरमध्ये रोकड, जरीपटक्यात लॅपटॉप अन् मोबाईल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 09:56 PM2019-10-21T21:56:33+5:302019-10-21T21:57:03+5:30

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तासांचा अवधी शिल्लक असताना सदरमध्ये काँग्रेसचे उमेदवार त्यांच्या मित्रांसोबत बसून असलेल्या एका कारमध्ये एक लाख पाच हजारांची रोकड सापडली.

Maharashtra Assembly Election 2019: Cash, Laptops and mobiles seized in Sadar, Jaripataka Nagpur | Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील सदरमध्ये रोकड, जरीपटक्यात लॅपटॉप अन् मोबाईल जप्त

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील सदरमध्ये रोकड, जरीपटक्यात लॅपटॉप अन् मोबाईल जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तासांचा अवधी शिल्लक असताना सदरमध्ये काँग्रेसचे उमेदवार त्यांच्या मित्रांसोबत बसून असलेल्या एका कारमध्ये एक लाख पाच हजारांची रोकड सापडली. तर, सोमवारी मतदान सुरू असताना जरीपटक्यातील एका इमारतीतून काही तरुण तरुणी भाजपला मतदान करण्याचे आवाहन करीत असल्याची तक्रार एका सी-व्हीजील अ‍ॅपवर एका व्यक्तीने केली. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांचे विशेष पथक तसेच पोलिसांनी तेथे धडकून लॅपटॉप तसेच मोबाईलसह काही जणांना ताब्यात घेतले.
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त निलोत्पल गस्त करीत असताना सोमवारी पहाटे १. ५० वाजता त्यांना राजनगर, पागलखाना चौकाजवळ एक स्वीफ्ट कार उभी दिसली. त्यात पश्चिम नागपूरचे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे, विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश गजभिये आणि आणखी काही जण बसून होते. उपायुक्त निलोत्पल यांच्या पथकातील पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यात पांढऱ्या रंगाचे लिफाफे आढळले. प्रत्येक लिफाफ्यात पाच हजार (एकूण १ लाख, ५ हजार) रुपये होते.
ही माहिती कळताच परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनिता साहू, सदरचे ठाणेदार महेश बनसोडे, तसेच मानकापूर, गिट्टीखदानचे पोलीस पथकही तेथे पोहचले. पोलिसांनी निवडणूक अधिकाऱ्यांचे विशेष पथक क्रमांक चारचे प्रभारी लोकेश गुप्ता आणि पथक क्रमांक तीनचे अशोक गोटांगळे यांनाही बोलवून घेतले. ही कार (एमएच ३१/ टीसी १०१) आणि रोकड ताब्यात घेऊन कारमालक सुभाष पाचबुधे तसेच विकास ठाकरे यांचे सदर पोलीस ठाण्यात बयाण नोंदविण्यात आले. त्यानंतर सर्वाना सोडून देण्यात आले. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच सोमवारी मतदान सुरू असताना सी-व्हीजील अ‍ॅपवर एका व्यक्तीने तक्रार केली. यात असे म्हटले होते की, जरीपटका येथील जिंजर मॉलच्या मागे रुट प्ले स्कूल नावाची एक इमारत आहे. या इमारतीमध्ये जवळपास ४० ते ५० तरुण मुलं मुली लॅपटॉप आणि मोबाईल घेऊन मतदारांना फोन करून भाजपला मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. त्यांच्याकडे मतदार याद्या आहेत. येथून पैसे आणि दारू वितरित केली जात असल्याचेही म्हटले होते. या तक्रारीवरून निवडणूक आयोगाच्या पथकाने या इमारतीत धाड टाकली, आणि चौकशी केली. येथून लॅपटॉप व मोबाईल जप्त केल्याचे सांगितले जाते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वेदप्रकाश आर्य आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश जग्यासी यांनी या ठिकाणांहून मतदारांना पैसे व दारू वितरित केली जात असल्याचा आरोप केला आहे. येथे ४० पेक्षा अधिक मुले मुली मतदार यादी घेऊन प्रत्येकाला फोन करून बोलावत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ही शाळा विक्की कुकरेजा यांची असल्याचा आरोपही केला. हे प्रकरण जरीपटका पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. याला वेदप्रकाश आर्य यांनी आक्षेप घेतला असून डीसीपीच्या सांगण्यावरून हे करण्यात आले आहे. डीसीपीला तातडीने निलंबित करण्यात यावे, अन्यथा मी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन करेल, असा इशाराही आर्य यांनी दिला.
दरम्यान भाजपचे नगरसेवक विक्की कुकरेजा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. आम्ही कुठल्याही आचारसंहितेचा भंग केला नाही. मतदान काळात प्रत्येक पक्षाला त्यांचा बूथ लावण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार आमचा बूथ लागलेला होता. संबंधित शाळा आमची नाही. त्या खासगी शाळेत वार्षिक कार्यक्रमासाठी सादर होणाºया नृत्याची तयारी सुरू होती. यावेळी शाळेच्या शिक्षिका व विद्यार्थिनी हजर होत्या. सार्वजनिक प्रचाराला बंदी असली तरी व्यक्तिगत प्रचाराला बंदी नाही, त्यानुसारच आमचे काम सुरू होते. काँग्रेसच्या तकारीवरून निवडणूक अधिकारी व पोलिसांनी ज्या पद्धतीने कारवाई केली त्याचा आम्ही निषेध करतो, असेही कुकरेजा म्हणाले.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Cash, Laptops and mobiles seized in Sadar, Jaripataka Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.