Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब केले मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 22:48 IST2019-10-21T20:08:52+5:302019-10-21T22:48:38+5:30
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात येऊन आपले मतदानाचे कर्तव्य बजावले. वनामतीजवळील धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेत सकाळी १०.३० च्या सुमारास मुख्यमंत्री पत्नी अमृता व आई सरिता यांच्यासह पोहोचले.

Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब केले मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात येऊन आपले मतदानाचे कर्तव्य बजावले. वनामतीजवळील धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेत सकाळी १०.३० च्या सुमारास मुख्यमंत्री पत्नी अमृता व आई सरिता यांच्यासह पोहोचले.
लोकशाहीमध्ये मतदानाचे महत्त्व आहे. प्रत्येकाच्या उमेदवारांकडून आशाआकांक्षा असतात. त्याची पूर्तता व्हावी यासाठी योग्य उमेदवाराला मत देणे आवश्यक असते. मतदानाचे कर्तव्य सर्वांनी बजावलेच पाहिजे. नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री येणार म्हणून त्या कालावधीत केंद्रावर जास्त प्रमाणात मतदार मतदान करण्यासाठी आले होते. यावेळी मतदार केंद्रावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी वाहनेदेखील १०० मीटर अंतरावर पार्क करण्याचे निर्देश दिले होते. तेथून ते पायीच चालत गेले.
मी ‘सीएम’ची आई, काम चांगलेच वाटते
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या आई सरिता फडणवीस यांनीदेखील मतदान केले. सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या कामासंदर्भात त्यांना विचारले असता मी मुख्यमंत्र्यांची आई आहे. इतर मातांप्रमाणे मलादेखील मुलाचे काम चांगलेच वाटते. विशेष म्हणजे जनतेसमोरदेखील विकासाची कामे दिसून आली आहेत, असे त्या म्हणाल्या.
राज्यपाल बनवारीलाल पुरोहितांचेदेखील मतदान
तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनीदेखील वनामतीजवळील धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेत सकाळी ९ च्या सुमारास कुटुंबीयांसह मतदान केले. विशेष म्हणजे राज्यपाल असूनदेखील पुरोहित हे मतदानासाठी रांगेत लागले होते. मतदान करून बाहेर निघाल्यानंतर पुरोहित यांनी सर्वांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन केले. नागपुरातील वातावरण आल्हाददायक आहे. त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदानासाठी बाहेर निघावे. लोकशाहीत मतदान करणे हे सर्वांचे कर्तव्य. १०० टक्के मतदान झाले पाहिजे. त्यामुळे संविधान आणखी मजबूत होईल, असेदेखील ते म्हणाले.