Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेस नेत्यांना गाडीही मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 12:16 AM2019-10-17T00:16:51+5:302019-10-17T00:18:32+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना गाडी न मिळाल्याने धावपळ करावी लागली. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी त्यांना चक्क रिक्षातून पोहोचावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राहुल गांधी यांच्या स्वागताला जाताना गाड्या न मिळाल्याने काँग्रेस नेत्यांना चक्क रिक्षाने जाण्याची वेळ आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना गाडी न मिळाल्याने धावपळ करावी लागली. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी त्यांना चक्क रिक्षातून पोहोचावे लागले.
राहुल गांधी यांची मंगळवारी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे सभा होती. राहुल गांधी हेलिकॉप्टरने वणीला पोहोचले. पण त्यावेळी काँग्रेस नेते सभास्थळी होते, त्यामुळे हेलिपॅडजवळ कुणी बडे नेते उपस्थित नव्हते. त्याचवेळी राहुल गांधींचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरल्याचे नेत्यांना समजले.
राहुल गांधी आल्याचे समजताच काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंसह सर्व दिग्गजांची तारांबळ उडाली. सभास्थळावरुन हेलिपॅडवर जाण्यासाठी एकच धावपळ सुरु झाली. मात्र त्यावेळी सभास्थळी गाड्या नसल्याने, हेलिपॅडपर्यंत जायचे कसे हा प्रश्न पडला. त्याचवेळी काँग्रेस नेत्यांना एक रिक्षा दिसली.
या रिक्षातून माणिकराव ठाकरे, खा. बाळू धानोरकर, काँग्रेस नेते शेखर शिरभाते, वणीचे काँग्रेस उमेदवार वामनराव कासावार चक्क राहुल गांधींना घ्यायला गेले. परत येताना राहुल गांधीसोबत असलेल्या एसपीजीच्या गाडीत बसून नेतेमंडळी सभास्थळी आली.