Maharashtra Assembly Election 2019 : आर्थिक मंदी भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे : मनीष तिवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 11:51 PM2019-10-16T23:51:51+5:302019-10-16T23:53:28+5:30
आज देशावर जे आर्थिक संकट कोसळले आहे त्याला भारतीय जनता पक्षाचे सरकार जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. मनीष तिवारी यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आधुनिक भारत घडविण्यात व्यावसायिकांचा मोठा सहभाग आहे. व्यावसायिकांनी आपली ताकद ओळखावी. आज देशावर जे आर्थिक संकट कोसळले आहे त्याला भारतीय जनता पक्षाचे सरकार जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. मनीष तिवारी यांनी केला.
ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसच्या वतीने आयोजित ‘इंडियन इकॉनॉमी-करंट सिनॅरियो-मिथ्स अॅण्ड रिअॅलिटीज' या कार्यक्रमात ते बुधवारी नागपुरात बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख उपस्थित होते. तिवारी म्हणाले, ही परिस्थिती बदलणे आता तुमच्या हातात आहे. उद्योगांमध्ये गुंतवणूक नाही त्यामुळे रोजगार निर्मिती नाही. चुुकीच्या पद्धतीने जीएसटी लागू केला. आर्थिक मंदी हे याचेच कारण आहे. सरकार व्यापारीविरोधी आहे. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेला गळती लागली. सरकारला आर्थिक दिवाळखोरीची कल्पना आल्याने त्यांनी रिझर्व्ह बँकेकडून पैसा घेतला. समाजात वैमनस्य निर्माण करण्याचे काम भाजपने केले. जनतेला उद्याची भीती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने आपला आवाज बुलंद करणे आवश्यक आहे. सत्तेच्या विरोधात आमच्या आवाजात आवाज मिसळून सत्तापरिवर्तन करा. डॉ. आशिष देशमुख यांच्या रूपाने आपल्या क्षेत्राचा आर्थिक विकास करावा, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. आशिष देशमुख म्हणाले, जनतेने संधी दिल्यास नागपूरचा आर्थिक विकास करू. या क्षेत्राचा कायापालट करू. भारतात आर्थिक मंदी आहे. मागील पाच वर्षात एकही उद्योग आणला नाही. आता पुन्हा एक कोटी रोजगाराचे गाजर जनतेला दाखविले जात आहे, त्यामुळे सावध राहा, असे आवाहन त्यांंनी केले. यावेळी काँग्रेसचे आशिष दुवा, विशाल मुत्तेमवार, ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.