Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात निवडणूक यंत्रणा २४ तास राबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 01:09 AM2019-10-23T01:09:38+5:302019-10-23T01:10:25+5:30
निवडणुका जाहीर झाल्यापासून तर निकाल जाहीर होईपर्यंतच्या कामातील महत्त्वाचा टप्पा असणारा मतदानाचा दिवस सोमवारी शांततेत पार पडला. मात्र या कामात सकाळी ५ वाजतापासून जुंपलेली यंत्रणा दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत जागत होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुका जाहीर झाल्यापासून तर निकाल जाहीर होईपर्यंतच्या कामातील महत्त्वाचा टप्पा असणारा मतदानाचा दिवस सोमवारी शांततेत पार पडला. मात्र या कामात सकाळी ५ वाजतापासून जुंपलेली यंत्रणा दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत जागत होती. त्यानंतरही आज मंगळवारी सकाळी निवडणूक विभागातील काही अधिकारी व कर्मचारी कामावर हजर होते.
निवडणुकीचे प्रत्येक काम युद्धपातळीवर केले जाते. त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची व्यवस्था केली जाते. जिल्ह्यात १२ मतदार संघात एकूण ४,४१२ मतदान केंद्र होते. त्यावर २० हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. निवडणूक शाखेत काम करणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांपासून तर प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मतदानाचा दिवस एक महत्त्वाचा टप्पा असतो. कर्मचाऱ्यांना एक दिवसाआधीच केंद्रावर जाऊन तेथे मुक्काम करावा लागतो. तेथील आवश्यक सोयीसुविधांची पाहणी करावी लागते. मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान जरी सकाळी ७ वाजतापसून सुरू होत असले तरी प्रत्यक्षात केंद्रावर तैनात असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काम त्यापूर्वीच दोन तास आधीपासून सुरू होते. ईव्हीएम मशीनची चाचणी, केंद्रावरील विद्युत पुरवठा, आवश्यक सुविधा, सुरक्षा आणि मतदानाची नोंद यासह इतरही कामांचा त्यात समावेश असतो. संपूर्ण दिवसभर ही प्रक्रिया चलते. यादरम्यान कर्मचाऱ्यांना त्यांची जागा सोडता येत नाही. मग केंद्रावर मतदार असो किंवा नसो. मतदानाची वेळ संपल्यावरही जर केंद्रावर मतदार असेल तर जोपर्यंत त्यांचे मतदान होत नाही तोपर्यंत त्यांना थांबणे बंधनकारक असते. मतदानाची प्रक्रिया आटोपल्यानंतर एकूण मतदार, झालेले मतदान, त्याची आकडेवारी, टक्केवारी याचा संपूर्ण तपशील नोंद करून निवडणूक शाखेला पाठविणे, त्यानंतर ईव्हीएम सील करून स्ट्राँग रुमवर घेऊन जाण्याची जबाबदारी केंद्रप्रमुख आणि कर्मचाऱ्यांची असते. स्ट्राँग रुममध्ये एकाच वेळी मतदार संघातील विविध केंद्रांच्या ईव्हीएम जमा होत असल्याने तेथेही मोठी गर्दी उसळते. प्रत्येक केंद्राच्या ईव्हीएम जमा करण्यास बराच वेळ होतो. तोपर्यंत कर्मचाऱ्यांना तेथेच थांबावे लागते. ही संपूर्ण प्रक्रिया पहाटेपर्यंत चालते.
सोमवारी मतदान आटोपल्यानंतर कर्मचारी पहाटे ४ वाजता घरी परतले. स्वत: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शाह, त्यांचा संपूर्ण स्टाफ, निवडणुकीची जबाबदरी सांभाळणारे सर्व उपजिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारची रात्र जागून काढली. मतदानाच्या कामात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याच बाबतीत असे घडले असे नाही तर या यंत्रणेवर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांनासुद्धा आयोगाकडे इत्थंभूत तपशील पाठविल्याशिवाय कार्यालय सोडता येत नाही. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरापर्यंत अधिकारी शहरातील वेगवेगळ्या स्ट्राँगरुमच्या कामकाजावर लक्ष ठेवून होते. त्यानंतर आज सकाळी पुन्हा स्ट्राँग रुमच्या सुरक्षेचे नियोजन, सोमवारी झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी काढणे, विविध प्रकारचे अहवाल आयोगाकडे पाठविणे यात यंत्रणा व्यस्त होती. जिल्हा माहिती विभागही रात्री उशिरापर्यंत राबत होता.
अनेक मतदारसंघाचे बूथनिहाय आकडे अद्याप जिल्हा शाखेला प्राप्त झाले नव्हते. ही सर्व प्रक्रिया करतानाच मतमोजणीच्या नियोजनाचेही काम सुरू झाले आहे. गुरुवारी मतमोजणी होणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक
दरम्यान, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मतदान प्रक्रिया शांततेत पर पडली. या कामात तैनात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.