Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात पहिल्या फेरीचा निकाल तासाभरात :  मतमोजणीची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 09:27 PM2019-10-22T21:27:24+5:302019-10-22T22:16:49+5:30

२४ तारखेला मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे. एकूण २०२ टेबलवर मतमोजणी होणार असून, एकूण २७४ फेऱ्या होतील. पहिल्या फेरीचा निकाल हा तासाभरात येईल. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रपरिषदेत सविस्तर माहिती दिली.

Maharashtra Assembly Election 2019: First round results in Nagpur in an hour: Preparations for counting completed | Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात पहिल्या फेरीचा निकाल तासाभरात :  मतमोजणीची तयारी पूर्ण

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात पहिल्या फेरीचा निकाल तासाभरात :  मतमोजणीची तयारी पूर्ण

googlenewsNext
ठळक मुद्दे२०२ टेबल, प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी : एकूण २७४ फेऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काही किरकोळ घटना वगळल्यास मतदान सुरळीत पार पडले. येत्या २४ तारखेला मतमोजणी होणार आहे. याची तयारी पूर्ण झाली असून, मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण २०२ टेबलवर मतमोजणी होणार असून, एकूण २७४ फेऱ्या होतील. पहिल्या फेरीचा निकाल हा तासाभरात येईल. 


जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत मतमोजणीबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शाह उपस्थित होते. जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले की, मतमोजणीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. प्रत्यक्ष मतमोजणीसाठी ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे विशेष प्रशिक्षण उद्या होणार आहे. विधानसभानिहाय होणाऱ्या मतमोजणीसाठी एकूण १४ ते २० टेबल लागणार आहेत. प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी राहतील. प्रत्येक विधानसभेत जवळपास १५० अधिकारी-कर्मचारी तैनात राहतील. १७ ते ३१ फेऱ्या होतील. पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 


व्हीव्हीपॅटची मोजणी सर्वात शेवटी
संपूर्ण फेरीची मतमोजणी झाल्यानंतरच व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात येईल. प्रत्येक विधानसभा मतदार संघातून पाच मतदार संघातील व्हीव्हीपॅटची मोजणी केली जाईल. तत्पूर्वी मतदानासोबतच पोस्टल बॅलेटचीही मोजणी होईल.

पोस्टल बॅलेट तातडीने पोहचविण्यासाठी वाहनांची सोय
एकूण १६,५०० कर्मचाऱ्यांनी बॅलेट पेपरसाठी अर्ज केला होता. आतापर्यंत एकूण २३६७ पोस्टल बॅलेट भरून आले आहेत. जास्तीत जास्त पोस्टल बॅलेट तातडीने पोहचावे यासाठी पोस्ट विभागाशी समन्वय ठेवण्यात आला आहे. त्यांना जास्तीच्या वाहनांची आवश्यकता होती. ती वाहने त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याचेही जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले.

मोबाईलवर बंदी
मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईलला बंदी राहील. केवळ निवडणूक निर्णय अधिकारी सोडले तर कुणालाही मोबाईल आत नेता येणार नाही. प्रसिद्धी माध्यमांनासुद्धा मोबाईल केवळ प्रसिद्धीमाध्यम कक्षापर्यंतच वापरण्याची परवानगीही राहील, असेही जिल्हाधिकारी ठाकरे यांनी स्पष्ट केले.

ईव्हीएमला त्रिस्तरीय सुरक्षा :१२ ठिकाणी स्ट्राँग रुम : सीसीटीव्ही कॅमेरे 

 प्रत्येक मतदार संघातील ईव्हीएम संबंधित मतदार संघाच्या मतमोजणीस्थळी उभारण्यात आलेल्या स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. 
 जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघापैकी शहरात सहा आणि ग्रामीणमध्ये सहा मतदार संघ आहेत. प्रत्येक मतदार संघासाठी स्वतंत्र मतमोजणीची व्यवस्था आहे. तसेच मतमोजणीस्थळाजवळच स्वतंत्रपणे स्ट्राँग रुम तयार करण्यात आली आहे. मतदान झाल्यानंतर सर्व केंद्रावरील ईव्हीएम तेथे सील करून ठेवण्यात आल्या. यासाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. केंद्रीय सुरक्षा बल, राज्य राखील दल आणि स्थानिक पोलीस अशी ही त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे. सर्वात बाहेर हे स्थानिक पोलीस आहेत, तर आतमध्ये राखीव दलाची सुरक्षा आहे. त्यांचा २४ तास खडा पहारा आहे. मतमोजणीनंतर शहरातील सर्व मतदार संघातील ईव्हीएम या कळमना येथे सुरक्षित ठेवल्या जातील, तर ग्रामीणमधील त्या त्या ठिकाणी राहील. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: First round results in Nagpur in an hour: Preparations for counting completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.