Maharashtra Assembly Election 2019 : संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी साथ द्या : मल्लिकार्जुन खरगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:46 AM2019-10-16T00:46:41+5:302019-10-16T00:54:36+5:30
देशाचे संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे फुले-शाहू-आंबेडकर व गांधी यांच्या विचारधारेवर चालणारा काँग्रेस पक्ष तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारावर चालणारा भाजप या दोघापैकी एकाची निवड निवडणुकीत करावयाची आहे. देशाचे संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी केले.
नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार क्षेत्रातील जाटतरोडी येथे आयोजित काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. खरगे म्हणाले, आपली लढाई ही मुख्यमंत्र्यांशी नाही, त्यांच्या विचारधारेशी आहे. लहान पक्षांना मतदान करून मत विभागणी करू नका. भाजपने देशाचे वाटोळे केले. बेरोजगारी वाढली. मार्के टिंग करून भाजपा लोकांची दिशाभूल करीत आहे. दलित व मागासवर्गीयांनी काँंग्रेसला साथ द्यावी, आरक्षण मिळू नये म्हणून भाजपा प्रयत्न करीत आहे. सरकारी संस्था खासगीकरणाचे काम सुरू आहे. संविधान वाचविण्यासाठी जागे व्हा. बाबासाहेबांची विचारधारा अविरत चालू राहील, यासाठी एकत्र या.
देशाचा जीडीपी कमी झाला. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या मागे पडला आहे. उद्योगात गुंतवणूक नाही. नवीन कारखाने नाहीत, रोजगार नाही. व्यवसाय बंद होत आहेत. बेरोजगारी वाढली. शेतकरी आत्महत्या वाढल्या. असे वास्तव असूनही मुख्यमंत्री आपल्या भाषणातून विकासाचा दावा करीत आहेत. भाषणामुळे लोकांचे पोट भरत नाही, तर यासाठी त्यांच्या दोन हाताला काम हवे असल्याची टीका खरगे यांनी केली. महाराष्ट्रातील निवडणूक ही देशाचे भवितव्य घडविणारी आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला सत्ता मिळाल्यास देशातील सत्ता परिवर्तनाला सुरुवात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बाळासाहेब थोरात यांनी दिशाभूल करणाऱ्या भाजपचा पराभव करण्याचे आवाहन के ले. आशिष देशमुख यांनी प्रास्ताविकात भाजपचा खरपूस समाचार घेतला. संधी मिळाल्यास या क्षेत्राचा कायापालट करण्याची ग्वाही दिली. व्यासपीठावर काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष रणजित देशमुख, अनिस अहमद, आशिष दुवा, संत भजनाराम, किशोर गजभिये, प्रफुल्ल गुडधे, दिलीप पनकुले, अलका कांबळे, अतुल लोंढे आदी उपस्थित होते.