Maharashtra Assembly Election 2019 : गाऊंड रिपोर्ट : नागपूर उत्तरमध्ये चुरशीची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 08:34 PM2019-10-16T20:34:41+5:302019-10-16T21:00:38+5:30

सर्व प्रमुख उमेदवार हे आंबेडकरी चळवळीतील चेहरे असून राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे उत्तर नागपुरात यावेळी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Assembly Election 2019: Ground Report: Close fight in Nagpur North | Maharashtra Assembly Election 2019 : गाऊंड रिपोर्ट : नागपूर उत्तरमध्ये चुरशीची लढाई

Maharashtra Assembly Election 2019 : गाऊंड रिपोर्ट : नागपूर उत्तरमध्ये चुरशीची लढाई

Next
ठळक मुद्दे काँग्रेसपुढे बसपा, वंचितचे आव्हान : भरपाईसाठी भाजपचा लागतोय कस

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंबेडकरी चळवळीचा गड समजल्या जाणाऱ्या उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ हा रिपाइंच्या हातून निसटून काँग्रेसकडे गेला, आणि मागच्या निवडणुकीत भाजपने तो काँग्रेसकडून हिसकावून घेतला. बसपाने या मतदार संघावर आपली पकड मजबूत केली आहे. मागच्या वेळी बसपा दुसऱ्या क्रमांकावर होता. यंदाही भाजपने डॉ. मिलिंद माने यांच्यावरच विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत पुन्हा मैदानात उतरले आहेत. तर बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे हे स्वत:च रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीकडे सुद्धा लक्ष लागले आहे. सर्व प्रमुख उमेदवार हे आंबेडकरी चळवळीतील चेहरे असून राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे उत्तर नागपुरात यावेळी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
डॉ. नितीन राऊत हे सलग १५ वर्षे उत्तरमधून निवडून आले. मात्र, २०१४ मध्ये त्यांना मोठा धक्का बसला. भाजपचे डॉ. मिलिंद माने यांनी त्यांना मात दिली. त्यावेळी बसपाच्या हत्तीवर स्वार झालेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये हे ५५,१८७ मते घेत दुसºया क्रमांकावर राहिले. राऊत हे तिसºया क्रमांकावर फेकल्या गेले. बसपाला संपूर्ण विदर्भातून सर्वाधिक मते या मतदार संघात मिळाली होती. भाजपचे सशक्त संघटन ही डॉ. माने यांची सर्वात जमेची बाजू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह देशभरातील भाजपचे स्टार प्रचारक उत्तर नापुरातही प्रचारात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये गडकरी हे केवळ याच मतदार संघात ८,९१० मतांनी माघारले होते. यापासून वेळीच सावध होत हे नुकसान भरून काढण्यसाठी भाजप कामाला लागली आहे.
काँग्रेसने यावेळीही डॉ. नितीन राऊत यांना मैदानात उतरविले आहे. गेल्या पाच वर्षांत राऊत यांचे पक्षातील वजनही आहे. मात्र, काँग्रेसमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी राऊत यांच्यासाठी मारक आहे. बसपानेही या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांना मैदानात उतरवून व त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी जाहीर सभा घेऊन आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. त्यामुळे संपूर्ण कॅडर सक्रिय झाले आहे. महापालिकेत बसपाचे १० नगरसेवक आहेत. ते सर्व उत्तर नागपुरातील असल्याचा फायदा बसपाला मिळताना दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीने विनय भांगे यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभेत ‘वंचित’च्या उमेदवाराने ६,५७३ मते घेतली होती. आता आपली ताकद आणखी वाढल्याचा त्यांचा दावा आहे. याशिवाय एमआयएम, आंबेडकराईट्स पार्टी व अपक्षासह एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. एकूणच नागपूर उत्तर विधानसभा मतदार संघात चुरशीची लढत पाहायला मिळेल, अशी परिस्थिती आहे.

एकूण उमेदवार - १४
एकूण मतदार - ३,८४, ५९४
पुरुष मतदार - १,९५,३९५
महिला मतदार - १,८९, १५९
इतर मतदार - ४०

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Ground Report: Close fight in Nagpur North

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.