Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : नागपूर पूर्वमध्ये  'कृष्णा'चा रथ रोखणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 11:17 PM2019-10-17T23:17:40+5:302019-10-17T23:19:01+5:30

नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात गेली विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळालेले डोळे विस्फारणारे मताधिक्य पाहता यावेळी ‘कृष्णा’चा विजयरथ रोखणे कठीण असल्याचे चित्र आहे.

Maharashtra Assembly Election 2019: Ground report: 'Krishna' chariot difficult to stop in Nagpur east | Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : नागपूर पूर्वमध्ये  'कृष्णा'चा रथ रोखणे कठीण

Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : नागपूर पूर्वमध्ये  'कृष्णा'चा रथ रोखणे कठीण

Next
ठळक मुद्देकाँग्रेसचा हजारेंना हात : बसपा व वंचितच्या उमेदवारांमुळे चुरस वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे आ. कृष्णा खोपडे हे विजयाची हॅट्ट्रिक मारण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसने त्यांना आव्हान देण्यासाठी नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांना ‘हात’ दिला आहे. मात्र, गेली विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळालेले डोळे विस्फारणारे मताधिक्य पाहता यावेळी ‘कृष्णा’चा विजयरथ रोखणे कठीण असल्याचे चित्र आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खोपडे यांनी काँग्रेसचे अ‍ॅड. अभिजित वंजारी यांचा ४० हजार ४७४ मतांनी पराभव केला होता. यावेळी काँग्रेसकडून वंजारी किंवा उमाकांत अग्निहोत्री यांना तिकीट मिळेल असा अंदाज वर्तविला जात असताना, ऐनवेळी नगरसेवक पुरुपोत्तम हजारे यांना उमेदवारी मिळाली. या जागेवर राष्ट्रवादीचे नगरसेवक दुनेश्वर पेठे यांनीही दावा केला होता. जागा राष्ट्रवादीला न मिळाल्याने तेही रुसले आहेत. बहुजन समाज पार्टीचे सागर लोखंडे, वंचित बहुजन आघाडीचे मंगलमूर्ती सोनकुसरे तर छत्तीसगड स्वाभिमान मंचतर्फे गोपालकृष्ण कश्यप यांच्यासह तीन अपक्ष असे एकूण आठ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. बसपा व वंचितच्या उमेदवारांमुळे चुरस वाढलेली असली तरी, खरी लढत भाजपाचे कृष्णा खोपडे आणि काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे यांच्यातच आहे.
१९६७ पासून २००४ पर्यंत एकूण नऊ विधानसभा निवडणुकांमध्ये नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने विजय मिळविला होता. १९९० पासून २००४ पर्यंतच्या चार विधानसभा निवडणुकात तर या मतदारसंघातून काँग्रेसचे सतीश चतुवेर्दी विजयी झाले होते. त्यामुळे या मतदारसंघाला काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानले जायचे. २००९ मध्ये खोपडे यांनी माजी मंत्री सतीश चतुवेर्दी यांचा तब्बल ३५ हजार २१६ मतांनी पराभव केला होता. आता सतीश चतुर्वेदी हे स्वत: ‘सारथी’ बनून हजारे यांच्या प्रचारासाठी उतरले आहेत. मात्र, मधली पाच वर्षे चतुर्वेदींनी दक्षिणेत घालविल्याने पूर्व भागात त्यांची जुनी पकड पाहिजे तशी राहिलेली नाही. विशेष म्हणजे, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूर शहरातील सहा मतदारसंघांपैकी सर्वाधिक ७५ हजारांहून अधिक मताधिक्य याच मतदारसंघात मिळाले होते.
खोपडे यांनी त्यांच्या मतदारसंघात सिम्बॉयसिस, ‘साई’चे केंद्र खेचून आणले. मतदारसंघातील विकास कामे व भविष्यात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता यामुळे खोपडे यांच्यासाठी यावेळीही परिस्थिती अनुकूल दिसते आहे. जातीय समीकरणांचा विचार केल्यास इथे ‘तेली’ समाजाच्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर ‘कुणबी’ समाजाचे मतदान आहे. ‘उत्तर भारतीय’ आणि ‘छत्तीसगडी’ मतदार तिसऱ्या क्रमांकावर आहे. ‘सिंधी-मारवाडी-गुजराती’ यासह अन्य जातीच्या मतदारांची संख्याही दखलपात्र आहे. कृष्णा खोपडे व पुरुषोत्तम हजारे दोघेही तेली समाजाचे असल्यामुळे, समाजाशिवाय इतर मुद्दे येथे अधिक प्रभावी ठरताना दिसत आहेत.

एकूण उमेदवार : ८
एकूण मतदार : ३,७१,८९३

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Ground report: 'Krishna' chariot difficult to stop in Nagpur east

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.