Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : नागपूर दक्षिणेत त्रिकोणी सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 01:19 AM2019-10-17T01:19:34+5:302019-10-17T01:20:02+5:30
एकूण १७ उमेदवार रिंगणात असलेल्या नागपूर दक्षिण मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार मोहन मते, काँग्रेसचे गिरीश पांडव व अपक्ष प्रमोद मानमोडे यांच्यात त्रिकोणी सामना होण्याची चिन्हे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या वेळी काँग्रेसला धूळ चारत भाजपने नागपूर दक्षिणची जागा जिंकली होती. यावेळी दोन्ही पक्षाने आपले उमेदवार बदलले असल्यामुळे मतदारांमध्ये उत्सुकता आहे. तर काँग्रेससह भाजप व शिवसेनेत झालेल्या बंडखोरीने आणखीनच गुंता वाढविला आहे. एकूण १७ उमेदवार रिंगणात असलेल्या या मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार मोहन मते, काँग्रेसचे गिरीश पांडव व अपक्ष प्रमोद मानमोडे यांच्यात त्रिकोणी सामना होण्याची चिन्हे आहेत.
२०१४ मध्ये भाजपचे आ. सुधाकर कोहळे यांनी पूर्वमधून दक्षिणेत काँग्रेसकडून लॅण्ड झालेले माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना ४३ हजार २१४ मतांची आघाडी घेत पराभूत केले होते. मात्र, यावेळी भाजपने कोहळे यांचे तिकीट कापत माजी आ. मोहन मते यांना संधी दिली. तर काँग्रेसनेही उमेदवार बदलून गिरीश पांडव यांना रिंगणात उतरविले आहे. तिकीट कटल्यामुळे नाराज असलेल्या कोहळे समर्थकांना समजविण्यात भाजप नेत्यांना मोठ्या प्रमाणात यश आले असून, कोहळे हे मतेंच्या प्रचारातही सहभागी झाले आहेत. मते यांनी विविध सांस्कृतिक व सामाजिक सोहळ्यांच्या माध्यमातून वर्षभरापासूनच काम सुरू केले होते. लोकसभेत दक्षिणमध्ये भाजपला मिळालेली ४३ हजार ५२४ मतांची आघाडी, नगरसेवकांची तगडी फळी व बळकट पक्ष संघटन, या मते यांच्या जमेच्या बाजू आहेत.
काँग्रेसमध्ये तिकिटासाठी अखेरच्या क्षणापर्यंत रस्सीखेच झाली. विशाल मुत्तेमवार, निर्मल उज्ज्वल सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांचे नाव जोरात चालले, पण पांडव यांनी हात मारला. पांडव यांचेही जुने नेटवर्क सक्रिय झाले आहे. तिकीट न मिळाल्यामुळे प्रमोद मानमोडे यांनी ‘हिरा’ घेऊन अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. मानमोडे यांनीदेखील गेल्या दोन वर्षांपासून सामाजिक व सहकार क्षेत्रासह महिला सक्षमीकरणासाठी काम करीत आपली स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. काँग्रेसची फळी पडद्यामागून आपल्यासोबत असल्याचा मानमोडे यांचा दावा आहे. बसपाने शंकर थूल तर वंचित बहुजन आघाडीने रमेश पिसे यांना रिंगणात उतरविले आहे. एकूणच मानमोडे यांच्यासह बसपा व वंचितच्या उमेदवारांनी काँग्रेसची डोकेदुखी वाढविली आहे.
दुसरीकडे भाजप व शिवसेनेतही दोन माजी उपमहापौरांनी बंडखोरी केली आहे. भाजपचे माजी महापौर सतीश होले रिंगणात आहेत. बंडखोरीमुळे होले यांना पक्षातून निलंबित केले असून, त्यामुळे त्यांना भाजपचा आधार उरलेला नाही. ते स्वबळावर हातपाय मारत आहेत. शिवसेनेचे माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांनीदेखील दंड थोपटले आहे. मात्र, कुमेरिया यांचे काम करू नका, असा आदेश मुंबईहून निघाल्याने कुमेरियाही एकाकी पडले आहेत. एकूणच या मतदारसंघात त्रिकोणी लढतीचे चित्र आहे. तर वंचित बहुजन आघाडीने रमेश पिसे यांना रिंगणात उतरविले आहे. मानमोडे यांच्यासह बसपा व वंचितच्या उमेदवारांनी येथे काँग्रेसची डोकेदुखी वाढविली आहे.
एकूण उमेदवार : १७
एकूण मतदार : ३,८२,२३८
पुरुष मतदार : १,९२,१३१
महिला मतदार : १,९०,१९८
इतर मतदार : ०१