Maharashtra Assembly Election 2019 : खुल्या प्रवर्गासाठी आणखी जागा वाढविणार : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 11:03 PM2019-10-16T23:03:46+5:302019-10-16T23:33:24+5:30
गुणवंत विद्यार्थ्यांची कुठलीही संधी हुकणार नाही. दरवर्षी या जागा वाढविण्यातच येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्व समाजातील मुलेमुली शिकली तर देशाला पुढे घेऊन जातील. विविध समाजाला सवलती मिळायच्या, मात्र खुल्या प्रवर्गाला कुठलेही आरक्षण नव्हते. २०१८ पूर्वी जेवढ्या जागा खुल्या प्रवर्गाला मिळत होत्या, तेवढ्याच जागा विविध संस्थांमध्ये वाढविण्याचा आमच्या सरकारने निर्णय घेतला. यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही व गुणवंत विद्यार्थ्यांची कुठलीही संधी हुकणार नाही. दरवर्षी या जागा वाढविण्यातच येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेल्या फडणवीस यांनी बुधवारी प्रतापनगर चौकाजवळ प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी महापौर नंदा जिचकार, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व समाजाला समान न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. ओबीसी समाजासाठी वेगळे मंत्रालय सुरु केले व ३५०० कोटींचा निधी दिला. तर खुल्या प्रवर्गासाठी आर्थिक विकास महामंडळ बनविण्यासाठी पावले उचलण्यात आली. या विद्यार्थ्यांनादेखील परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. खासगी महाविद्यालयांतील ५० टक्के शुल्क प्रतिपूर्ती होते. ६०२ अभ्यासक्रमांत सर्व समाजांतील विद्यार्थ्यांना मदत होत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘मेट्रो’च्या तिसऱ्या टप्प्यालाही मंजुरी मिळणार
यंदाच्या निवडणूका या ऐतिहासिक राहणार आहेत. कारण जनतेला याचा निर्णय अगोदरपासूनच माहीत आहे. विरोधकांची स्थिती अतिशय वाईट झाली आहे. महाराष्ट्रासोबतच नागपुरातही नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात परिवर्तन झाले आहे व विकासाची मालिकाच सुरू झाली आहे. १९९५ मध्ये आम्ही ‘मिहान’ची संकल्पना मांडली. १९९९ नंतर १५ वर्षे काहीच झाले नाही. उद्योग यावेत यासाठी आम्ही विशेष ‘इन्सेन्टिव्ह’ देण्यास सुरुवात केली. त्यामुळे गुंतवणूक येत आहे. ‘मेट्रो’च्या तिसऱ्या टप्प्याचा प्रस्तावदेखील केंद्राकडे मंजुरीकडे पाठविला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
राहुल गांधी यांच्यामुळे भाजपचा फायदाच
आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनादेखील चिमटे काढले. कॉंग्रेसने राहुल गांधी यांची प्रत्येक मतदारसंघात सभा आयोजित करावी. कारण ते जेथे जातात तेथे भाजपचा विजय होतो व मताधिक्य दुप्पट होते. महाराष्ट्रातील कॉंग्रेसची स्थिती त्यांना माहीत आहे. कॉंग्रेसला यावेळी ४२ काय २४ जागादेखील मिळणार नाहीत. त्यामुळे ते प्रचारासाठी फारसे आले नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
झुडपी जंगलांवरील रहिवाशांना मालकी मिळणार
नागपुरातील एकात्मतानगर, तकिया येथील झुडपी जंगलांवर अनेकांची घरे आहेत. त्यांना मालकी हक्क मिळू शकत नव्हता. आम्ही केंद्राकडे गेलो व निर्णय करून घेतला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातदेखील गेलो. लवकरच यासंबंधातील अहवाल सर्वोच्च न्यायालय स्वीकारणार आहे. यानंतर झुडपी जंगलांवरील रहिवाशांना मालकी हक्क पट्टे मिळतील. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील झुडपी जंगलांवर राहणारे आपल्या जमिनीचे मालक होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.