Maharashtra Assembly Election 2019 :मिसेस सीएम म्हणतात, पुढील पाच वर्षदेखील विकासाचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:23 AM2019-10-15T00:23:19+5:302019-10-15T00:43:59+5:30

मागील पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासासाठी एक ‘व्हिजन’ पाहिले व त्या दृष्टीने कार्य केले. सकारात्मक प्रवासाची ही गती कायम राहील व पुढील पाच वर्षदेखील विकासाचीच असतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला.

Maharashtra Assembly Election 2019 : Mrs CM says, the next five years of development | Maharashtra Assembly Election 2019 :मिसेस सीएम म्हणतात, पुढील पाच वर्षदेखील विकासाचीच

Maharashtra Assembly Election 2019 :मिसेस सीएम म्हणतात, पुढील पाच वर्षदेखील विकासाचीच

Next
ठळक मुद्देकार्यकर्तेच मुख्यमंत्र्यांचा खरा चेहरा : राजकारणात प्रवेश...कधीच नाही

योगेश पांडे / कमल शर्मा/ लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०१४ च्या तुलनेत आता स्थिती व निवडणुकीतील प्रचारातील भूमिका बदलली आहे. अगोदर केवळ मतदारसंघापुरता प्रचार मर्यादित होता, आता मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर संपूर्ण राज्याची धुरा आहे. मागील पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासासाठी एक ‘व्हिजन’ पाहिले व त्या दृष्टीने कार्य केले. सकारात्मक प्रवासाची ही गती कायम राहील व पुढील पाच वर्षदेखील विकासाचीच असतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या निवडणूक प्रचारात व्यस्त असताना अमृता फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील प्रचारावर भर दिला आहे. यावेळी त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.
२०१४ पर्यंत महाराष्ट्र व नागपुरातील अनेक प्रकल्प केवळ फायलींमध्ये होते. ते प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात केवळ सुरूच झालेले नाहीत, तर त्यांना गती मिळाली आहे. ‘स्मार्ट सिटी’पासून ‘जलयुक्त शिवार’, मेट्रो, समृद्धी महामार्ग, शिक्षणसंस्था, ग्रामविकासापर्यंत विविध मुद्यांत मुख्यमंत्र्यांनी चौफेर लक्ष दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी केवळ नागपूरच नव्हे तर इतर शहरांतदेखील विकास घडवून आणला आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या ‘व्हिजन’मुळे विकास दिसून येत आहे, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

ग्रामविकासाला नवीन गती मिळेल
ज्या दिशेने मुख्यमंत्र्यांनी काम केले आहे ते पुढील पाच वर्षांत निश्चितच कायम असेल. ‘जलयुक्त शिवार’मुळे अनेक शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता दूर झाली आहे. परंतु या योजनेत आणखी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून काम झाले पाहिजे. ‘क्लायमेट सायन्स’वरदेखील भर दिला गेला पाहिजे. त्यामुळे शेतकºयाला तंत्रज्ञानाचा आधार मिळेल. सोबतच बचत गटाला जास्तीत जास्त ‘मार्केट’ मिळावे व यातून ‘स्टार्ट अप्स’ समोर यावेत यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांच्या जेवणासाठी असते काळजी
प्रचाराची व्यस्तता असल्यामुळे मुख्यमंत्री नियमित व्यायाम करू शकत नाही. त्यांची झोपदेखील पूर्ण होत नाही. जेवणाची वेळदेखील पाळता येत नाही, त्याची काळजी वाटते. मात्र मुख्यमंत्री जेथेही जातील त्यांच्या आहारासंदर्भात मी आवश्यक त्या सूचना ‘स्टाफ’ला देते. त्यातही अनेकदा बाहेर खावे लागते. परंतु आता लोक ‘डायट फूड’ देत असल्याचे दिसून येत आहे, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले.

‘ते’ घरी वेळ देऊ शकले नाही, पण तरी समाधानी
मुख्यमंत्री मागील पाच वर्ष घरच्यांना वेळच देऊ शकले नाहीत. आम्ही कधीच बाहेर जाऊ शकलो नाही किंवा चित्रपटदेखील पाहू शकलो नाही. मात्र याची खंत वाटत नाही व माझी काही तक्रारदेखील नाही. कारण त्यांना जनतेच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी, राज्यासाठी झटताना मी पाहत आहे. त्यासमोर या वैयक्तिक बाबी काहीच नाहीत. आता आमचे कुटुंब केवळ आमच्या चार-पाच जण किंवा नातेवाईकांपुरते मर्यादित राहिलेले नाही. संपूर्ण महाराष्ट्रच आमचे कुटुंब आहे. मुख्यमंत्री एका तऱ्हेने कुटुंबीयांनाच वेळ देत आहेत. याचेच मला जास्त समाधान आहे, असे उद्गार अमृता फडणवीस यांनी काढले.

माझ्याहून जास्त जबाबदारी कार्यकर्त्यांनीच घेतलीय
देवेंद्र फडणवीस हे मतदारसंघात लक्ष घालू शकत नाहीत, त्यांच्यावर महाराष्ट्राची धुरा आहे. मात्र कार्यकते जोमाने कामाला लागले आहेत. मुख्यमंत्र्यांची जबाबदारी वाढली आहे त्याची जाणीव नागपुरातील कार्यकर्त्यांनादेखील आहे. कार्यकर्ते हेच देवेंद्र फडणवीस यांचा खरा चेहरा आहेत. मी जेव्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधते तेव्हा लक्षात येते की कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराची जबाबदारी घेतली आहे. प्रत्येक जण ‘मी आहे देवेंद्र’ याच उत्साहाने काम करत आहे. माझ्याहून जास्त जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतली आहे, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले.

राजकारणापेक्षा समाजकारणच जवळचे
जर सर्व सोडून केवळ राजकारणावरच लक्ष केंद्रित करता येत असेल तर तेथे जायला हवे. मी पूर्णवेळ लक्ष देऊ शकत नाही. मला खूप गोष्टी करायला आवडतात. मी ग्रामविकासासाठी कार्यरत आहेत. ‘अ‍ॅसिड’ हल्ला झालेल्या तरुणींसाठी काम करत आहे, शिवाय आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या हितासाठीदेखील काम सुरू आहे. समाजकारणातील विविध उपक्रमांशी मी जुळले आहे. शिवाय घराकडेदेखील लक्ष द्यायचे आहे व माझी गाण्याची आवड जपायची आहे. त्यामुळे राजकारणाकडे लक्ष देऊ शकेल असे मला वाटत नाही. मी राजकारणाच्या चौकटीत बसू शकतच नाही, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.

नागपूरचा चेहरामोहरा बदलणार
‘लॉजिस्टिक’मध्ये प्रचंड बदल घडून येईल. ‘मिहान’च्या कामालादेखील गती मिळाली आहे. अडथळे दूर होत आहेत. २०० कोटी नागपूर रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणासाठी दिले आहेत. यामुळे पर्यटन व गुंतवणुकीला चालना मिळेल. नागपुरात दीक्षाभूमी, कोराडी, रामटेक या पर्यटन स्थळांना आवश्यक निधी दिला व येथील सुविधा वाढविण्यावर भर दिला. दीक्षाभूमीला तर ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे. मागील पाच वर्षांप्रमाणेच विकासाची गती राहिली तर नागपूर २०३० मध्ये हे जगातील सर्वात जास्त प्रगती करणाऱ्या अव्वल १० शहरात समाविष्ट होईल असे ‘वर्ल्ड इकॉनॉमी फोरम’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०२४ पर्यंत शहराचा चेहरामोहराच बदलेल, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.

फेटरीकर माझे कुटुंबीयच
मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात मागील पाच वर्षांत आमूलाग्र बदल झाले आहेत. फेटरीकर माझे कुटुंबीयच झाले आहेत. तेथे जाऊन मला समाधान मिळते. फेटरी हे आदर्श गाव झाले आहे. पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे. अगोदर तेथे अनेक समस्या होत्या. अंगणवाड्या, ग्रामविकास केंद्राचा विकास झाला आहे. परंतु तरुणांना जास्त रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. ‘फॅशन डिझायनिंग’साठी ‘सेटअप’ करतो आहे. यात तेथील महिलांना घरबसल्या रोजगार मिळू शकेल, अशी माहिती अमृता फडणवीस यांनी दिली.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019 : Mrs CM says, the next five years of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.