Maharashtra Assembly Election 2019 : माझे मत लोकशाहीला, होय मी मतदान करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:34 AM2019-10-16T00:34:09+5:302019-10-16T00:35:48+5:30
विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था मतदान जागृतीसाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांनी मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पाळावे तसेच ‘माझे मत अमूल्य असून मी मतदान करणार’ असा संकल्प प्रत्येक मतदाराने करावा यासाठी विविध संस्था तसेच संघटनांनी पुढाकार घेतला आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था मतदान जागृतीसाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात मंगळवारी इंडियन मेडिकल असोसिएशन, चार्टर्ड अकाऊंटट ऑफ इंडिया (नागपूर शाखा), शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या विविध संघटनांची बैठक जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शहरातील सुमारे २१०० मतदान केंद्रांवर ५० टक्केपेक्षा कमी मतदान झाले होते. विधानसभेसाठी येत्या २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. शहरातील प्रत्येक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी, मतदारांना जागृत करण्याच्या दृष्टीने स्वीप कार्यक्रमांतर्गत प्रशासनातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
मतदारांमध्ये मतदान करण्यासंदर्भात वैद्यकीय व्यावसायिक, सनदी लेखापाल तसेच अभियंत्याची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. वैद्यकीय व्यावसायिकांनी मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासंदर्भात सामूहिक आवाहन करण्यात येणार आहे. यासाठी आयएमएच्या डॉ. लक्ष्मी श्रीखंडे, डॉ.अल्का मुखर्जी, डॉ.झुनझुनवाला, डॉ.प्रियंका कांबळे, डॉ.इम्रान आदींनी संघटनेच्यामार्फत जनतेला आवाहन करण्यात येणार असल्याचे सांगितले. मतदान जागृती अभियानामध्ये सहभाग म्हणून प्रत्येक हॉस्पिटल तसेच क्लिनीकमध्ये मतदानासंदर्भात मार्गदर्शन व आवाहन करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ.संजीव जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.आर.पातुरकर, नागपूर महानगर पालिकेचा आरोग्य उपसंचालक डॉ.भावना सोनकुसरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनीही मतदार जागृती अभियानात सहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.
सनदी लेखापालांचा मतदार जागृतीमध्ये सहभाग
मतदार जागृती अभियानामध्ये सनदी लेखापालांच्या संघटनेचा सहभाग राहणार असून विदर्भातील सुमारे ४५०० सनदी लेखापाल तसेच १२ हजार विद्यार्थ्यांपर्यंत ‘मी मतदान करणार’ या मोहिमेअंतर्गत २१ ऑक्टोबर रोजी मतदान करण्याचा संकल्प करण्यात येणार असल्याची माहिती सनदी लेखापाल संघटनेचे प्रमुख जुल्फेस शाह, अक्षय गुल्हाने, हरीष रंजवानी, जितेंद्र संगवानी, संजय अग्रवाल, साकेत बागडीया आदींनी केले आहे.