Maharashtra Assembly Election 2019 : नागपूरला देशातील अव्वल शहर बनविणार : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 10:31 PM2019-10-17T22:31:50+5:302019-10-17T22:32:53+5:30
आतापर्यंत जो विकास झाला तो ‘ट्रेलर’ होता. खरा ‘पिक्चर’ तर अद्याप बाकीच आहे. नागपूरला आम्ही देशातील अव्वल शहर बनवू, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नागपूरचा वेगाने विकास झाला आहे. आम्ही दोघेही जनतेच्या सहकार्यामुळेच हे करू शकलो. आतापर्यंत जो विकास झाला तो ‘ट्रेलर’ होता. खरा ‘पिक्चर’ तर अद्याप बाकीच आहे. नागपूरला आम्ही देशातील अव्वल शहर बनवू, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. राज्याचे मुख्यमंत्री व दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारासाठी आयोजित श्यामनगर येथील सभेत ते गुरुवारी बोलत होते.
या प्रचारसभेला महापौर नंदा जिचकार, मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी, नगरसेवक अविनाश ठाकरे, राजीव हडप प्रामुख्याने उपस्थित होते. मागील पाच वर्षांत नागपुरात विकासाला सुरुवात झाली आहे. नागपूर मेट्रो सुरू झाली. २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना पुढील दीड वर्षांत पूर्ण होईल व नागरिकांना २४ तास पिण्याचे पाणी मिळेल. अजनी रेल्वेस्थानकाजवळ ‘मल्टिमॉडेल’ हब होणार आहे. यामुळे सर्व बसेस अजनीपासूनच सुटतील. नागपुरात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था आल्या आहेत. मैदानांचा विकास सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी क्रीडा मैदानांच्या विकासासाठी ६० कोटींचा विशेष निधीदेखील दिला आहे. ‘आयटी’ कंपन्यांची कामे ‘मिहान’मध्ये सुरू झाली आहेत. पुढील दोन वर्षांत येथील रोजगाराचा आकडा ५० हजारांवर जाईल. मागील ५० वर्षांत झाली नाही त्याहून जास्त कामे ५ वर्षांत झाली, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातदेखील विकास झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तू व साहित्याचे संग्रहालय साकारत आहे. याशिवाय ड्रॅगन पॅलेससाठीदेखील १०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सवात तर यावर्षी अडीच हजार सतार व व्हायोलिन वादक एकत्रितपणे वादन करतील. आम्ही विकास करताना कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही, असे गडकरी म्हणाले.
माझा आशीर्वाद मुख्यमंत्र्यांच्याच पाठीशी
यावेळी गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार आशिष देशमुख यांना चिमटा काढला. काही उमेदवार बगिच्यात फिरतात तसे प्रचाराला फिरत आहेत. त्यांच्यासाठी पक्ष म्हणजे बँडबाजाच आहे. विजयादशमीच्या दिवशी देशमुख माझ्या निवासस्थानी आले होते. त्यादिवशी घरी आलेल्या प्रत्येकाची भेट घेऊन लहानांना आशीर्वाद देण्याची परंपराच आहे. परंतु त्यांच्या हेतूबाबत सांगता येत नाही. त्यांनी बाहेर जाऊन सांगितले असते की, ‘गडकरींचा आशीर्वाद माझ्याच पाठीशी’. मी आशिष देशमुख यांना स्पष्ट सांगितले की, याचे फोटोवगैरे काढायचे नाही. फडणवीस हे भाजपचे उमेदवार आहेत. अशास्थितीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराला आशीर्वाद देणे शक्यच नाही. माझा आशीर्वाद मुख्यमंत्री व भाजपच्या उमेदवारांसोबतच असेल, असा गौप्यस्फोट गडकरी यांनी केला.