Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर पूर्वेमध्ये सायंकाळपर्यंत संथगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 11:55 PM2019-10-21T23:55:14+5:302019-10-21T23:58:09+5:30
संवेदनशिल समजल्या जाणाऱ्या पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणूक शांततेत पार पडली. सर्वच ठिकाणी सकाळी पहिल्या फेरीपासून तिसऱ्या फेरीपर्यंत उत्साह दिसून आला असला तरी त्यानंतर मात्र मतदारांमधील उत्साह कमी झालेला दिसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संवेदनशिल समजल्या जाणाऱ्या पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणूक शांततेत पार पडली. सर्वच ठिकाणी सकाळी पहिल्या फेरीपासून तिसऱ्या फेरीपर्यंत उत्साह दिसून आला असला तरी त्यानंतर मात्र मतदारांमधील उत्साह कमी झालेला दिसला. परिणामत: अनेक मतदान केंद्रावरील टक्केवारी दुपारनंतर संथपणे वाढत राहिली. सायंकाळी वेळ संपण्याच्या तासभरापूर्वी पुन्हा काही केद्रांवर गर्दी जाणवली. मागील निवडणुकीप्रमाणे या वेळीही मतदारांच्या नावांमध्ये घोळ दिसला. त्यामुळे बऱ्याच मतदारांना हक्कापासून वंचित राहावे लागले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी वर्धमान नगरातील श्रेयश विद्यालयातील मतदान केंद्रापुढे ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’च्या कार्यकर्त्यांनी टोप्या घालून प्रवेशद्वारातच ठिय्या दिला. यामुळे काही काळ सौम्य तणाव निर्माण झाला होता. शासकीय यंत्रणा कार्यात व्यस्त असली तरी १३ ठिकाणी व्ही.व्ही. पॅट बंद पडल्याच्या घटना घडल्या. मात्र तत्परतेने नवीन यंत्र लावण्यात आले. सजविलेले सखी मतदान केंद्र मतदारांसाठी आकर्षणाचा विषय ठरले असले तरी व्हीएमव्ही कॉलेजमधील आदर्श मतदान केंद्रात आदर्श म्हणावे, असे वेगळेपण मात्र जाणवले नाही. युवक मतदारांचा दिवसभर उत्साह दिसला. पक्षांचे बुथही हायटेक दिसले. अनेक युवक लॅपटॉप घेऊन मतदार चिठ्ठयांचे वाटा करताना दिसले, तर काही बुथवर मात्र शुशुकाट जाणवला.
सखी मतदान केंद्रावर माय-लेकरेही विसवली
केडीके कॉलेजमधील केंद्र क्रमांक २५९ हे सखी मतदान केंद्र होते. या केंद्रावरील सजावट येणाऱ्या मतदारांना प्रसन्न करणारी होती. बाहेर लावलेल्या सेल्फी पॉइंटचा आनंद अनेक महिला घेताना दिसल्या. केंद्राबाहेर लहान बाळांसाठी असलेला पाळणा आणि खेळण्यांचा मनमुराद आनंद लुटताना बच्चेकंपनी दिली. मुलांसोबत त्यांचे पालकही तिथे विसावलेले जाणवले. केंद्र रंगीबेरंगी फुग्यांनी सजविलेले होते. केंद्राध्यक्षापासून तर बीएलओ कर्मचाऱ्यापर्यंत महिलाच नियुक्त होत्या. या केंद्रावर सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत४७.८९ टक्के मतदानाची नोंद झाली. केंद्रप्रमुख डॉ. अभिलाषा राऊत होत्या.
आदर्श मतदान केंद्र नावाचेच
व्हिएमव्ही कॉलेजमधील आदर्श मतदान केंद्र सखी केंद्राच्या तुलनेत बरेच मागे जाणवले. महाविद्याालयाच्या इमारतीमधील सुविधा वगळता आदर्श म्हणावे, अशा सुविधा दिसल्या नाहीत. सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथे ५३.६० टक्के मतदान झाले होते. केंद्राध्यक्ष म्हणून दिनेश वालदे यांच्याकडे येथील जबाबदारी होती.
‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ कार्यकर्त्यांना पोलिसांनी पिटाळले
सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या कार्यकर्त्यांनी दुपारी १२.४५ वाजता वर्धमान नगरातील श्रेयस विद्यालयापुढे टोप्या घालून ठिय्या मांडला होता. हा प्रकार लक्षात आल्यावर पोलीस निरीक्षक राखी गेडाम यांनी त्यांना हटविण्याचा प्रयत्न केला. त्यावरून बाचाबाची झाली. कार्यकर्ते जुमानत नसल्याचे पाहून लकडगंजचे पोलीस निरीक्षक भानुसास पिदुरकर यांच्या नेतृत्वात अधिकची पोलीस कुमक पोहचली. त्यांनी या कार्यकर्त्यांची समज घालून तिथून जाण्यास सांगितले. तरीही कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर कायद्याचा धाक दाखविल्यावर मात्र ते १०० मिटर अंतरावर जाऊन बसले.
नावात घोळ, अनेकजण हक्कापासून वंचित
नागपूर पूर्वमधील अनेक मतदान केंद्रांवर या वेळीही नावांमध्ये घोळ झाले. मतदानासाठी केंद्रावर आलेल्या अनेकांना यामुळे मतदानापासून वंचित राहावे लागले. कृषी नगरात रहाणारे खिलेश्वर करंडे यांनी स्वत:सह पत्नीचेही नाव नोंदविले होते. मात्र मतदार यादीत पत्नीचे नाव गायब होते. हिवरी नगर येथील प्रशांत विद्यालयात मतदानासाठी आलेल्या अमिता मनोज गर्ग यांना नावच बदललेले दिसले. अमिता एवजी अमिना असे नाव झाल्याने केंद्राध्यांनी मतदान करण्यापासून खोखले. अखेर दीड तासांच्या खटाटोपानंतर त्यांना मतदानाची परवानगी देण्यात आली. याच केंद्रावर विजया मारडकर मतदानासाठी आल्या असता त्त्यांच्या नावाने यापूर्वीच कुणीतरी मतदान करून गेल्याचे सांगण्यात आल्या. यामुळे एकच गोंधळ उडाला. आपण मतदानच केले नसल्याचे त्यांनी वारंवार सांगितल्यावर पुन्हा यादी तपासण्यात आली असता चुकीने त्यांच्या नावपुढे टिकमार्क ठरण्यात आल्याचा खुलासा केंद्राध्ळक्षांनी केला. तेव्हा कुठे त्यांनाही मतदानाचा हक्क बजावता आला. नवमहाराष्ट्र शाळेमध्येही असञा चप्रकार घडला. रमणा मारोती नगरात राहणारे प्रविण लाड यांच्या नावाने दुसºयानेच मतदान केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे त्यांची मतदानाची संधी हुकली. तेलंगीपुरा येथील हनुमान मंदिराजवळील १४५ क्रमांकाच्या केंद्रावर मतदानासाठी आलेल्या सतरंजीपुरा येथील कमल कृष्णराव कळमकर यांचे नावच मतदार यादीत बदललेले दिसले. त्यांचा यादीवरील आधार क्रमांक आणि झोटो बरोबर असला तरी नाव ‘ऋषी मोदी’ असे झाल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले.
१३ ठिकाणी व्हीव्ही पॅट बदलले
या मतदार संघातील १३ केंद्रांवरील व्हीव्ही पॅट बंद पडल्याने ते ऐनवेळी बदलण्याची वेळ आली. या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी शितल देशमुख यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या बाबीला दुजोरा दिला. मात्र ती १३ केंद्र कोणती हे मात्र त्यांनी सांगितले नाही. वातावरणातील आर्द्रतेमुळे असे घडल्याचे प्रारंभी सांगण्यात आले होते. मात्र त्यालाही कुणी अधिकृत दुजोरा दिला नाही.
डिप्टी सिग्नल केंद्रावर चक्क कार्यकर्त्यांचा ठिय्या
डिप्टी सिग्नल परिसरात असलेल्या संजय नगर मनपा शाळेतील मतदान केंद्रावर सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास एका पक्षांचे कार्यकर्ते चक्क खुच्या आणि बेंचेसवर ठिय्या मांडून बसले होते. एवढेच नाही तर चक्क केंद्रासमोरच अनेकांनी वाहनेही लावली होती. या पूर्वी भाजपाचे उमेदवार कृष्णा खोपडे तिथे आले होते. त्यांनी या कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते निघून गेल्यावरही ही मंडळी बसलेलीच होती. हा प्रकार लक्षात आल्यावर पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले. त्यांची वाहनेही बाहेर काढली.
केंद्रांपुढे दिसला बीएलओंचा ढिग
कर्मचाऱ्यांमार्फत बीएलओनचे ८९ टक्के वाटप झाल्याचे प्रशासनाने सांगितले असले तरी अनेक केंद्रांवर बीएलओंचा ढिग दिसला. मतदानासाठी थेटकेंद्रांवर येणाऱ्या मतदारांना या चिठ्या दिल्या जात असल्याचे पाहण्यात आले. अनेक ठिकाणी तर उमेदवारांच्या बुथवरूनच मतदारांनी चिठ्या आणल्याने बीएलओची गरजच पडली नाही. परिणामत: केंद्रापुढे लावलेल्या बीएलओ कर्मचाऱ्यांच्या टेबलवर बीएलओचा ढिग दुपारनंतरही दिसत होता.
पुरुषोत्तम हजारे
काँग्रेसचे उमेदवार पुरुषोत्तम हजारे म्हणाले, जनतेचा कौल आमच्या बाजुने दिसला. युवकांचाही चांगला प्रतिसाद जाणवला. मतदार आणि कार्यकर्त्यांना बदल हवा आहे. हे लक्षात घेता १२ ते १५ हजारांच्या फरकाने आपला विजय होईल.
कृष्णा खोपडे
भाजपाचे उमेदवार कृष्णा खोपडे म्हणाले, सर्वच वर्गातून आपणावर मतदानाच्या रूपाने जनतेने प्रेम व्यक्त केले आहे. आम्ही केलेली विकासकामे हीच आमची शक्ती आहे. जनता विकासासोबत असल्याने माझा विजय पक्का आहे.
नागपूर पूर्व
एकूण मतदार : ३,७१,८९३
महिला मतदार : १,७८,७८४
पुरूष मतदार : १,९३, १००
तृतीयपंथी : ९
एकूण मतदान केंद्र-३३६