Maharashtra Assembly Election 2019: नागपूर पश्चिममध्ये 'वंचित'चा अर्ज रद्द : पक्षाने नोंदवला आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 10:24 PM2019-10-05T22:24:17+5:302019-10-05T22:27:52+5:30
उमेदवारी अर्जांच्या शनिवारी झालेल्या छाननीमध्ये नागपूर पश्चिम मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सोनू प्रभाकर चहांदे यांचा अर्ज अवैध ठरला. यावर पक्षाने आक्षेप घेतला असून अधिकाऱ्याच्या चुकीमुळेच अर्ज रद्द झाल्याचा आरोप केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमेदवारी अर्जांच्या शनिवारी झालेल्या छाननीमध्ये नागपूर पश्चिम मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सोनू प्रभाकर चहांदे यांचा अर्ज अवैध ठरला. यावर पक्षाने आक्षेप घेतला असून अधिकाऱ्याच्या चुकीमुळेच अर्ज रद्द झाल्याचा आरोप केला आहे.
उमेदवार सोनू चहांदे यांनी सांगितले की, ४ तारखेला दुपारी २.४० वाजता मी पक्षाच्यावतीने पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज सादर केला. पक्ष मान्यताप्राप्त नसल्याने उमेदवारी अर्जात १० अनुमोदकांची नावे त्यांच्या स्वाक्षरीसह जोडली होती. अर्जामध्ये पूर्ण माहिती भरली होती. परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मला विचारले की, तुम्ही अपक्ष आहात की पक्षाचे आहात मी पक्षाचे नाव सांगितले. तेव्हा मला केवळ एकाच अनुमोदाची गरज असल्याचे सांगत १० जणांची स्वाक्षरीसह नावे असलेला कागद अर्जातून काढून टाकला. परंतु आज शनिवारी छाननीमध्ये दहा अनुमोदकाची नावे नसल्याचे कारण सांगून अर्ज रद्द केला. यासाठी सुनावणीची विनंती केली असता ती सुद्धा नाकारण्यात आली. त्यामुळे या संदर्भात उमेदवारातर्फे न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, असे वंचित बहुजन आघाडीचे महासचिव सागर डबरासे यांनी सांगितले.