Maharashtra Assembly Election 2019 : बावनकुळेंच्या नव्या जोमाने कार्यकर्त्यांना ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:14 PM2019-10-14T23:14:28+5:302019-10-14T23:20:24+5:30
काहीसे नैराश्य आणि कार्यकर्त्यांना आलेली मरगळ झटकून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपल्या स्वभावाप्रमाणे जोशात कामाला लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी वाटपाच्या वेळी भाजपमध्ये महानाट्य घडून शेवटच्या क्षणी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट मिळाले नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. हा बराच मोठा धक्का मानला जात होता. यात अंतर्गत राजकारण झाले अशा विविध अफवा, वावड्या निर्माण झाल्या. परंतु असे काही नसल्याचे दोन दिवसात स्पष्ट झाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बावनकुळे यांची पूर्व विदर्भ प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती केली. या माध्यमातून बावनकुळे यांच्याकडे ३२ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आली आहे.
काहीसे नैराश्य आणि कार्यकर्त्यांना आलेली मरगळ झटकून बावनकुळे आपल्या स्वभावाप्रमाणे जोशात कामाला लागले आहेत. पूर्व विदर्भासोबतच त्यांच्या जनसंपर्क आणि मंत्री म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा फायदा पक्षाने विदर्भातील आणि इतरही मतदारसंघात घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार शुक्रवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या चिखली (बुलढाणा), कारंजा (वाशिम) व धारणी (अमरावती) येथील जाहीर सभेत बावकुळे हे शहांसोबत पूर्णवेळ उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भात प्रचार करीत असताना बावनकुळे त्यांच्यासोबत पूर्णवेळ उपस्थित राहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारी झालेल्या साकोली (भंडारा) येथील सभेत बावनकुळे यांना मानाचे स्थान देण्यात आले.
पालकमंत्री या नात्याने भंडारा, गोंदिया, नागपूर व वर्धा या चार जिल्ह्यात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. पक्षाला त्याची जाणीव असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवत त्यांना नव्या जोमाने कामाला लावले आहे. कामठीच्या सभेत नितीन गडकरी यांनी बावनकुळे यांचा गौरव करीत त्यांचा पूर्ण सन्मान जपला जाईल, असे जाहीर वचन नागरिकांना दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांच्यावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही कार्यकर्त्यांना दिली आहे.
सकाळी ७ ते रात्री २ प्रचार !
सध्या बावनकुळे हे सकाळी ७ पासून प्रचाराला निघतात आणि रात्री २ वाजता घरी येतात. घरी आल्यानंतरही एक तास पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतात. प्रत्यक्ष फोनवर प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्या अडचणी जाणून घेतात व तातडीने सोडवितात. प्रत्येक जिल्ह्यातील बूथ प्रमुख, पेज प्रमुख यांच्याशी थेट संपर्क साधून प्रचारासंबंधी बारीकसारीक माहिती घेतात. आलेली माहिती रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दिल्लीतील पक्ष नेतृत्वाला देतात. भाजपचे सर्वच नेते त्यांचा उल्लेख ऊर्जावान मंत्री म्हणून करीत होते. आता नव्या जोमाने कामाला लागून त्यांचा ऊर्जावान संघटन कौशल्याचा अनुभव भाजप कार्यकर्ते घेत आहेत.