Maharashtra Assembly Election 2019 : प्रमोद मानमोडेंचे बाईक रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 12:23 AM2019-10-20T00:23:46+5:302019-10-20T00:24:06+5:30
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी दक्षिण विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी दक्षिण विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली काढण्यात आली. जवळपास ५०० बाईकस्वार असलेल्या रॅलीत महिला, युवक, वयस्क मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.
खुल्या जीपवर स्वार झालेल्या मानमोडे यांच्यासोबत माजी महापौर पांडुरंग हिवरकर, प्रफुल्ल शेंडे, इशाक पटेल, इसाक मंजूरी, गोरखनाथ सोलंके, किशोर कडू, चित्रा वनवे, मीरा पाटील, शोभाताई सोलंके, नत्थूजी मानमोडे, गौरव मानमोडे, प्रसाद मानमोडे, चंद्रभान पाटील, भगवान बनाईत, दिनेश अलोणे, गणेश काळे, गणेश नाखले, विनायक गवडी, अॅड. हर्षवर्धन बांते, अभिजित खोकले, जरीना खान, रेहाना सय्यद यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी मानमोडे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.
मानमोडे म्हणाले, रोजगाराची स्थिती भीषण आहे. आरोग्य सुविधांपासून सर्वसामान्य वंचित आहेत. तंत्रशिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. यावर कुणीही का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी तिरंगा चौक आणि अयोध्यानगर चौकात जाहीर केला. मानमोडे म्हणाले, मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी लोखंडी चमच्याला सोन्याचा बनविण्याचे सामर्थ्य माझ्यात आहे. एक सामाजिक दायित्व म्हणून समाजकार्य करीत आहे. सरकारने दोन कोटी रोजगार देण्याचे वचन पाळले नाही. एक लाख महिलांना रोजगारासाठी रेडिमेड गारमेंट हब बनविण्यात येणार आहे. एक संधी द्या, संधीचे सोने करेन, असे आवाहन त्यांनी केले.