Maharashtra Assembly Election 2019 : मतदारांपर्यंत व्होटर स्लीप १६ ऑक्टोबरपूर्वी पोहोचवा : चंद्रभूषण कुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 10:31 PM2019-10-12T22:31:20+5:302019-10-12T22:32:43+5:30
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी ‘व्होटर स्लीप’चे वाटप १६ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करा, अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार यांनी शनिवारी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी ‘व्होटर स्लीप’चे वाटप १६ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करा, अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार यांनी शनिवारी दिले.
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपूर विभागातील मतदार संघनिहाय निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे करावयाच्या व्यवस्थेचा आढावा उपनिवडणूक आयुक्त यांनी घेतला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, भारत निवडणूक आयोगाचे विशेष खर्च निरीक्षक मुरली कुमार, पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय उपस्थित होते.
विभागातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय मतदान केंद्र्रांवर करावयाच्या आवश्यक सुविधेसह दिव्यांग मतदारांसाठी करावयाच्या आवश्यक व्यवस्थेसंदर्भातील आढावा घेताना उपनिवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार म्हणाले की, मतदारांना मतदान केंद्र्र तसेच मतदार यादीतील नावांबाबत माहिती असलेली व्होटर स्लीप वाटपासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी विशेष मोहीम राबवून प्रत्येक मतदारांपर्यंत १६ ऑक्टोबरपूर्वी पोहचविण्याची व्यवस्था करावी, तसेच यासंदर्भातील दैनंदिन अहवाल आयोगाला सादर करावा, अशा सूचना यावेळी दिल्या.
दिव्यांग मतदारांना मतदानासाठी रॅम्पसह इतर आवश्यक सुविधा, आवश्यकतेनुसार व्हीलचेअर, अंध मतदारांसाठी ब्रेललिपीतील व्होटर स्लीप मतदान केंद्रावर उपलब्ध करून द्याव्यात. निवडणुकीसंदर्भात मतदारसंघनिहाय करण्यात आलेल्या व्यवस्थेसंदर्भातील भंडारा, वर्धा, चंद्रपूूर व नागपूर जिल्ह्याचा आढावा जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून घेण्यात आला. यामध्ये मतदान केंद्रावर करण्यात यावयाची व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, ईव्हीएम पॅडची संख्या, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, सुरक्षेचा आढावा, मतदान जागृती आढावा अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती तसेच वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आदी विषयांवर माहिती घेतली.
निवडणूक खर्चाचा हिशेब नियमित द्यावा
विशेष खर्च विषयक निरीक्षक मुरली कुमार यांनीही निवडणूक काळात विशेष मोहिमेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या तपासणी मोहीम अधिक प्रभावी करावी. तसेच या तपासणीमध्ये रोख, अवैध दारू आदी साहित्य जप्त करुन त्याबाबतचा अहवाल नियमित सादर करावा, अशा सूचना यावेळी दिल्यात.
कायदा व सुव्यवस्था कायम ठेवा
विधानसभेच्या निवडणुका निर्भय व निष्पक्षपणे पार पाडण्याच्या दृष्टीने तसेच कुठेही कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होणार नाही यासाठी आराखडा तयार करुन त्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी. मतदान केंद्रावर गर्दी होणार नाही तसेच मतदारांना सहजपणे मतदान करता येईल यादृष्टीने नियोजन करावे. तसेच मतदारसंघनिहाय गठित करण्यात आलेल्या विशेष तपासणी पथकांकडून प्रत्येक तसेच संशयित वाहनाची तपासणी करणे, आंतरराज्य व आंतरजिल्हा नाक्यावर कायम तपासणी पथके तैनात करावी. या पथकाकडून दैनंदिन अहवाल मागवावा, असेही त्यांनी सांगितले.