Maharashtra Assembly Election 2019 : संविधानाच्या संरक्षणासाठी काँग्रेसला साथ द्या : नितीन राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 11:34 PM2019-10-18T23:34:50+5:302019-10-18T23:35:13+5:30
संविधानाचे रक्षणकर्ता एकमेव काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन उत्तर नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांनी यशोधरानगर येथील जाहीर सभेत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रात असो की राज्यात भारतीय जनता पक्षाने संविधानाचे वेळोवेळी उल्लंघन केले आहे. संविधानाचे रक्षणकर्ता एकमेव काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन उत्तर नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांनी यशोधरानगर येथील जाहीर सभेत केले.
ते म्हणाले की, विकासाच्या प्रक्रियेत उत्तर नागपूर अजूनही मागास आहे. निव्वळ आश्वासनांच्या जोरावर भाजपाने उत्तर नागपुरात बाजी मारली. पण गेल्या पाच वर्षात दिलेली आश्वासने पुरती पोकळ ठरली. उत्तर नागपूरच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने विकास फक्त काँग्रेसच करू शकते, असा दावाही त्यांनी केला. शुक्रवारी डॉ. राऊत यांच्या यशोधरानगर, संघर्षनगर, बाळाभाऊ पेठ, सिद्धार्थनगर, दीक्षितनगर, शेंडेनगर आदी ठिकाणी जाहीर सभा झाल्या. दरम्यान, सकाळी विविध वस्त्यांमध्ये पदयात्राद्वारे त्यांनी जनसंपर्क साधला. यात ते म्हणाले की, काँग्रेसच्या काळात जनतेला महागाईचे चटके भेडसावले नाही. पेट्रोलच्या किमती काँग्रेसच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्या नाही. आज समाज बेरोजगारीच्या झळा सोसत आहे. तरुणांच्या हाताला नोकरी नाही, उद्योगधंदे बंद पडत आहे. मंदीचे सावट या देशावर पसरले आहे. विविध करांच्या नावावर जनतेला लुटले जात आहे. सामान्य जनतेला लुटणाऱ्या भाजपाला थांबविण्याचे आवाहन यावेळी त्यांनी जनतेला केले. दरम्यान, उत्तर नागपुरातील जगत सेलिब्रेशन हॉलमध्ये काँग्रेस पक्षाच्या बूथ एजंटची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला नितीन राऊत यांच्यासोबत माजी खासदार गेव्ह आवारी, प्रदेश उपाध्यक्ष जिया पटेल, प्रवक्ता संजय दुबे, बंडोपंत टेंभुर्णे, नगरसेवक दिनेश यादव, क्षितिज अड्याळकर आदी उपस्थित होते.