Maharashtra Assembly Election 2019 : चहा ७ रुपये, कॉफी १२ रुपये : उमेदवारांसाठी खर्चाचे दर निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 08:48 PM2019-10-10T20:48:11+5:302019-10-10T20:49:40+5:30
निवडणूक विभागाने प्रचार साहित्यांसह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा नाश्ता व जेवणाची दरसूची निश्चित केली आहे. यानुसार एक कप चहासाठी ७ रुपये तर कॉफीसाठी १२ रुपये निश्चित केले असून जेवणासाठी शाकाहारी थाळी १०० व तर मांसाहारी थाळीसाठी २०० रुपये निश्चित केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. पदयात्रा, जाहीर सभा, रॅली व आणि लहान मोठ्या बैठकांचा (कॉर्नर मिटिंग) जोर वाढला आहे. यात चहा, नाश्त्यापासून तर जेवणाचीही व्यवस्था केली जात आहे. निवडणूक विभागाने प्रचार साहित्यांसह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा नाश्ता व जेवणाची दरसूची निश्चित केली आहे. यानुसार एक कप चहासाठी ७ रुपये तर कॉफीसाठी १२ रुपये निश्चित केले असून जेवणासाठी शाकाहारी थाळी १०० व तर मांसाहारी थाळीसाठी २०० रुपये निश्चित केले आहे. जेवणाचा खर्च बहेर कितीही असला तरी निवडणूक आयोगाकडे मात्र हाच दर नोंदवण्यात येणार आहे.
येत्या २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील १२ विधानसभा क्षेत्रातील राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांच्या प्रचार खर्चासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दरसूची तयार केली होती. निवडणुकीकरिता उमेदवारास खर्चाची मर्यादा जवळपास २८ लक्ष रुपये इतकी आहे. त्यावर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर निश्चित करण्यात आली आहे. यात उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्त्यांद्वारे वापरण्यात येणाऱ्या प्रचार व प्रसिद्धीच्या साहित्याचे दर ठरवण्यात आले आहेत. उमेदवारांकडून वापर करण्यात येणाऱ्या साहित्याची नोंद ठेवून त्यांच्या खर्चाची नोंद प्रशासनामार्फत ठेवली जाणार आहे. प्रचाराची यंत्रणा, हॉटेल व लॉजचे भाडे, इतर साहित्य, स्टेशनरी, नाश्ता व जेवण, वाहनांच्या वापरावर होणाऱ्या खर्चाचे निकष ठरवण्यात आले आहेत. एकवेळच्या शाकाहारी भोजनासाठी १०० रुपये तर मांसाहारी भोजनासाठी २०० रुपये प्रति व्यक्ती इतके दर निश्चित करण्यात आले आहे. लस्सीसाठी २० रुपये, कोल्ड ड्रींककरिता २०, स्नॅक्सकरिता २५ रुपये मोजावे लागतील. राजकीय पक्षाच्या प्रचार सभेत, रॅलीत किंवा 'कॉर्नर मिटींग'ला शेकडो, हजारो लोक उपस्थित राहतात. या सर्वांची व्यवस्था करावी लागते. परंतु उमेदवार प्रत्यक्षात किती लोक दर्शवितात, यावर सर्व काही अवलंबन आहे.
असे आहेत साहित्य व त्याचे दर
प्रकार प्रती नग/दिवस दर
- संदल २४०० रुपये
- टी-शर्ट ६५ रुपये
- दरी २४ रुपये प्रती दिवस
- बेडशीट १० रुपये प्रती दिवस
- गांधी टोपी ४.८० रुपये
- दुपट्टा ४ रुपये
- गादी ७ रुपये प्रती दिवस
- टेबल ६.७६ प्रती दिवस