विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 10:39 AM2024-11-08T10:39:31+5:302024-11-08T10:41:52+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार नारायण जांभुळे यांनी दाखल केली याचिका
Maharashtra Assembly Election 2024 : नागपूर : ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राविरुद्ध स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार नारायण जांभुळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे. त्यावर आज न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे.
जांभुळे यांचा वडेट्टीवार यांच्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप आहे. वडेट्टीवार यांनी ज्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर केले, तो स्टॅम्प पेपर त्यांच्या पत्नीनी स्वतःच्या नावावर खरेदी केला आहे. वडेट्टीवार त्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करू शकत नाहीत. त्यामुळे स्टॅम्प कायद्यानुसार त्यांचे प्रतिज्ञापत्र अवैध आहे.
तसेच, हा स्टॅम्प पेपर करारनाम्यासाठी खरेदी करण्यात आला आहे. परंतु, त्याचा उपयोग प्रतिज्ञापत्रासाठी करण्यात आला. करिता, वडेट्टीवार यांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरवून रद्द करण्यात यावे, असे जांभुळे यांचे म्हणणे आहे.