भाजपच्या ‘होम पीच’वर यावेळीही फडणवीसांना ‘डबल हॅट्ट्रिक’ची संधी

By योगेश पांडे | Published: October 29, 2024 10:17 AM2024-10-29T10:17:26+5:302024-10-29T10:32:19+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : मताधिक्याच्या उतरत्या ग्राफमुळे आव्हान : काँग्रेसचे गुडधे देणार दमदार टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 : Devendra Fadnavis has a chance for a 'double hat trick' on BJP's 'home pitch' this time as well | भाजपच्या ‘होम पीच’वर यावेळीही फडणवीसांना ‘डबल हॅट्ट्रिक’ची संधी

भाजपच्या ‘होम पीच’वर यावेळीही फडणवीसांना ‘डबल हॅट्ट्रिक’ची संधी

- योगेश पांडे

नागपूर : उपराजधानीतील स्मार्ट मतदारसंघ व भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम जागेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यंदा राजकीय कारकिर्दीतील ‘डबल हॅट्ट्रिक’ची संधी आहे. मात्र, मागील काही निवडणुकांच्या तुलनेत यंदा फडणवीस यांच्यासमोरील आव्हानांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: या मतदारसंघात विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपचा मताधिक्याचा ग्राफ उतरता राहिला आहे. त्यामुळे काॅंग्रेसचे प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्याशी फडणवीसांना पूर्ण ताकदीने लढावे लागणार आहे.

या मतदारसंघात खुला प्रवर्ग, ओबीसी, सिंधी व अनुसूचित जातीच्या मतदारांची लक्षणीय संख्या आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही येथे चांगले नेटवर्क आहे. २००९ साली विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघ तयार झाला, तेव्हापासून येथे भाजपचे प्राबल्य आहे. २०१९ च्या  निवडणुकीत फडणवीस यांनी येथून विजयाची हॅट्ट्रिक केली होती. राज्याच्या राजकारणात व्यग्र असले तरी फडणवीस हे नियमितपणे  मतदारसंघाचा आढावा घेतात व अगदी सामान्य कार्यकर्त्याच्या घरीदेखील भेट देतात. 

काही पट्ट्यात तिरंगी लढतीची दाट शक्यता 
हरयाणा विधानसभा निवडणुकीत सहप्रभारी असलेल्या काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे यांच्याविरोधात फडणवीस यांची ही दुसरी लढत ठरेल. २०१४ मध्ये फडणवीसांनी गुडधेंवर ५८,९४२ मतांनी विजय मिळवला होता. याशिवाय यंदा वंचित बहुजन आघाडीकडून विनय भांगे यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यांचेही आव्हान महत्त्वाचे ठरू शकेल. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे
संथ गतीने सुरू असलेली विकासकामे, कचरा, पार्किंग, अतिक्रमण समस्या, ऑरेंज स्ट्रीटवरील ग्रीन कव्हर हटविणे
नागपूर शहरातील २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेचा फुटलेला फुगा

लोकसभेत मताधिक्य घटले
भाजपचा बालेकिल्ला असूनही लोकसभा निवडणुकीत दक्षिण-पश्चिम नागपुरात भाजपला धक्का बसला. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांना ३३,५३५ मतांची आघाडी मिळाली.२०१९ साली गडकरी यांचे दक्षिण-पश्चिम नागपुरात ५५,११६ इतके मताधिक्य होते. यावेळी मताधिक्य २१,५८१ ने घटले. २०१४ मध्ये त्यांचे मताधिक्य ६२,७२३ इतके होते.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : Devendra Fadnavis has a chance for a 'double hat trick' on BJP's 'home pitch' this time as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.