उमेदवार ठरविताना दोन्हीकडे दमछाक, सामना होणार अटीतटीचा

By कमलेश वानखेडे | Published: October 28, 2024 10:24 AM2024-10-28T10:24:59+5:302024-10-28T10:25:35+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : जागा वाटपावरून सुरू असलेल्या रस्सीखेचमुळे एका जागेवरील उमेदवार अद्याप गुलदस्त्यात

Maharashtra Assembly Election 2024 : While deciding the candidate, both sides will be tired, the match will be tough | उमेदवार ठरविताना दोन्हीकडे दमछाक, सामना होणार अटीतटीचा

उमेदवार ठरविताना दोन्हीकडे दमछाक, सामना होणार अटीतटीचा

Maharashtra Assembly Election 2024 : नागपूर : एकमेकांना कडवी झुंज देण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजप व काँग्रेसचे उमेदवार ठरविताना दमछाक होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे तीन दिग्गज नेते नागपूरचे असतानाही भाजपला अद्याप आपले सहा उमेदवार जाहीर करता आलेले नाहीत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) व उद्धवसेनेत जागा वाटपावरून सुरू असलेल्या रस्सीखेचमुळे एका जागेवरील उमेदवार अद्याप गुलदस्त्यात असून दोन जागांवर उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. आजवर जाहीर झालेले उमेदवार व दोन्हीकडील तयारी पाहता सामना अटीतटीचा होण्याची चिन्हे आहेत.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नागपूर शहर व जिल्ह्यातील १२ पैकी तब्बल ११ जागा भाजपने जिंकल्या होत्या. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत आघाडीने युतीला तगडी टक्कर दिली. भाजपला जागा कायम राखण्यात यश आले तर काँग्रेसने ४ जागा भाजपकडून हिसकावल्या. काटोलात राष्ट्रवादीने बाजी मारली तर आ. आशिष जयस्वाल यांनी अपक्ष निवडून येत रामटेकचा गड राखला होता. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतील पक्षफुटीचा नागपूर जिल्ह्यातील राजकारणावरही परिणाम झाला. रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. आता त्यांना शिंदेसेनेची उमेदवारी जाहीर झाली. मात्र त्यांच्या उमेदवारीला भाजपचे माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध चालविला आहे.

महाविकास आघाडीत रामटेकसाठी जोरात रस्सीखेच झाली. शेवटी उद्धवसेनेला ही जागा गेली व विशाल बरबटे यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र, येथून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक इच्छुक होते. आता रामटेक काँग्रेसला द्यावी व उमरेड उद्धवसेनेने लढावी, या प्रस्तावावर मंथन सुरू आहे. काहीच तडजोड झाली नाही तर रामटेक मतदारसंघात सांगली पॅटर्न करावा यासाठी कार्यकर्त्यांचा पक्षावर दबाव वाढत आहे. रामटेकच्या घोळामुळे उमरेडचे घोडे अडले आहे. उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिंदेसेनेकडून रामटेक लोकसभेची निवडणूक लढविली. त्यात त्यांचा पराभव झाला. पण काँग्रेसचा एक आमदार कमी झाला. आता उमरेडची जागा शिंदेसेनेला सुटते की भाजपला यावर राजू पारवे यांचे भवितव्य अवलंबून आहे. जिल्हा बँका घोटाळ्यात शिक्षा झाल्यामुळे काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली. त्यामुळे सावनेर मतदारसंघातून यावेळी त्यांच्या पत्नी अनुजा केदार रिंगणात आहेत. भाजप त्यांच्या विरोधात धनोजे कुणबी कार्ड खेळण्याच्या तसेच महिला उमेदवार देण्याच्या विचारात आहेत. पण काटोलात संधी हुकली तर ऐनवेळी माजी आ. आशिष देशमुख यांची एन्ट्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अ. भा. काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल गुडधे रिंगणात आहेत. कामठी मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांचे तिकीट कापून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी जि. प. अध्यक्ष सुरेश भोयर रिंगणात आहेत. या दोन्ही हायप्रोफाईल मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीने (शरद पवार) काटोलमधून पुन्हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पण भाजपने पत्ता उघडलेला नाही. चरणसिंग ठाकूर की आशिष देशमुख असा वाद सुरू आहे. रविवारी राष्ट्रवादीच्या यादीत हिंगण्यासाठी माजी मंत्री रमेश बंग यांचे नाव आले. ते भाजपचे आ. समीर मेघे यांना टक्कर देतील. पूर्व नागपूरसाठी राष्ट्रवादीने दुनेश्वर पेठे यांच्या नावाची घोषणा करीत एबी फॉर्म दिला आहे. पण आता हिंगण्याची जागा राष्ट्रवादीला गेल्याने पूर्व नागपूरची जागा काँग्रेसकडे खेचण्याची जोरात प्रयत्न सुरू आहेत. 

नागपूर शहरातील पश्चिम नागपूर, मध्य नागपूर व उत्तर नागपूर या तीन जागांवर काँग्रेसने आपल्या जुन्याच उमेदवारांना संधी दिली आहे. पश्चिम नागपुरात आ. विकास ठाकरे, उत्तर नागपुरात माजी मंत्री डॉ. नितीन राऊत तर मध्य नागपुरात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांना रिंगणात उतरविले आहे. भाजपने मात्र अद्याप उमेदवारांची घोषणा केलेली नाही. या तीनही मतदारसंघातील सामाजिक समीकरणे विचारात घेता उमेदवार ठरविताना भाजप नेत्यांचा कस लागत आहे.

जिल्ह्यातील विधानसभांचे चित्र असे
मतदारसंघ     मतदान     विद्यमान आमदार     पक्ष     मिळालेली               मते
नागपूर द. प.     ५०.३७     देवेंद्र फडणवीस     भाजप     १,०९,२३७
दक्षिण नागपूर     ५०.८०     मोहन मते     भाजप    ८४,३३९
पूर्व नागपूर     ५३.५३     कृष्णा खोपडे     भाजप    १,०३,९९२
पश्चिम नागपूर     ४९.६०     विकास ठाकरे     काँग्रेस    ८३,२५२
उत्तर नागपूर    ५१.११     नितीन राऊत     काँग्रेस     ८६,८२१
काटोल    ७०.५५    अनिल देशमुख     राष्ट्रवादी    ९६,८४२
सावनेर    ६८.१४    सुनील केदार (आमदारकी रद्द)    काँग्रेस     १,१३,१८४
हिंगणा     ५७.३५     समीर मेघे     भाजप     १,२१,३०५
उमरेड     ६८.२३    राजू पारवे (राजीनामा)    काँग्रेस     ९१,९६८
कामठी     ५८.९५    टेकचंद सावरकर     भाजप    १,१८,१८२
रामटेक     ७०.०७    आशिष जयस्वाल     शिंदेसेना     ६७,४१९

निवडणुकीतील कळीचे मुद्दे
मिहान प्रकल्पाचा पाहिजे तसा विस्तार झालेला नाही. जिल्ह्यात नव्याने मोठा उद्योग आलेला नाही.
शहरी व ग्रामीण भागात बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. सोयाबीन व इतर शेतमालाचे पडलेले भाव. तालुकास्तरावरील एमआयडींची दुरवस्था.
नागपूर सुधार प्रन्यास अद्याप बरखास्त नाही.
नागपूर शहरात सिमेंट रोडच्या बांधकामांमुळे निर्माण झालेले प्रश्न.
शहरातील विविध भागांत 
पावसाचे पाणी शिरल्याने निर्माण झालेली समस्या. जातीय समीकरणांची जुळवाजुळव

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : While deciding the candidate, both sides will be tired, the match will be tough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.