अनिल देशमुखांवरील दगडहल्ला ‘फेक’, सहानभूती मिळविण्यासाठी रचले नाटक; माजी राज्यमंत्री परिणय फुके यांचा आरोप
By योगेश पांडे | Published: November 19, 2024 12:39 AM2024-11-19T00:39:49+5:302024-11-19T00:42:34+5:30
लोकांची सहानभूती मिळविण्यासाठी हा ड्रामा करण्याच आल्याचा आरोप फुके यांनी लावला.
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून राजकारण तापले असतानाच माजी राज्यमंत्री व भाजपचे नेते आ.परिणय फुके यांनी हा हल्लाच बनावट असल्याचा दावा केला आहे. अनिल देशमुखांकडून असा प्रकार होऊ शकतो असे भाकित मी अगोदरच प्रचार सभांमध्ये वर्तविले होते. लोकांची सहानभूती मिळविण्यासाठी हा ड्रामा करण्याच आल्याचा आरोप फुके यांनी लावला.
काटोलमधील जनतेला मी याबाबत अगोदरच सतर्क केले होते. ही दगडफेक होणार असे भाकित मी अगोदरच केले होते. याबाबतचे विविध फोटो पाहिले की यातील फोलपणा लक्षात येत आहे. १० किलोंचा दगड त्यांच्या कारवर पडलेला दिसतो आहे. मात्र १० फुटांवरुन सामान्य व्यक्ती १० किलोंचा दगड फेकून मारू शकत नाही. काटोलच्या शेतकऱ्यांना याची जाण आहे. इतका मोठा दगड कारच्या बोनेटवर पडला असताना कारला तेथे स्क्रॅचदेखील लागलेली नाही. काचदेखील पूर्ण न फुटका काचेला भेगा पडल्या आहेत. पॅसेंजर सीटच्या खालीदेखील एक दगड ठेवलेला दिसत आहे. या सर्व बाबी संशयास्पद आहेत. मागील २५ वर्षांपासून अनिल देशमुख यांनी जनतेशी दिशाभूल केली. मुलाला जिंकविण्यासाठी त्यांनी बनावट दगडहल्ला त्यांनी करवून आणला आहे.